रत्नागिरी : कोकणात इगतपुरीसारखे भव्य विपश्यना केंद्र व्हावे, हे गोएंका गुरूजी यांनी पाहिलेले स्वप्न आता वास्तवात येणार आहे. पाली (ता. रत्नागिरी) पासून दोन किलोमीटरवर असलेल्या पाथरट येथे पुण्याच्या विपश्यना साधकाने दान दिलेल्या साडेसहा एकर जमिनीवर हा प्रकल्प लवकरच उभारला जाणार आहे. याकरिता रविवारी पाथरट येथील नियोजित भूमीवर ज्येष्ठ गुरूंचे मार्गदर्शन होणार आहे.यासाठी ‘कोकण विपश्यना मेडिटेशन सेंटर’ नावाने ट्रस्ट स्थापन करण्यात आली आहे. पाथरट येथील नयनरम्य परिसरात हा प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. इगतपुरी येथील विपश्यना विद्यापीठांतर्गत या केंद्राचे कार्य चालणार असल्याने रत्नागिरीसह, सिंधुदुर्ग, रायगड तसेच गोवा राज्यातील साधकांना या विपश्यना केंद्राचा विनामूल्य लाभ होणार आहे. या केंद्राची उभारणी विपश्यना पूर्ण केलेल्या साधकांनी उभारलेल्या दानाच्या रकमेतून करण्यात येणार आहे, हे विशेष.जीवनातील ध्यान साधनेचे महत्त्व लक्षात घेऊन शासनातर्फे शाळांमध्ये विपश्यनेचाच एक भाग असलेल्या आनापान उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ६०० प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलांसाठी या ‘मित्र’ उपक्रमांतर्गत आनापान वर्ग घेतले जात आहेत. या उपक्रमाचे प्रमुख जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात, तर सचिव शिक्षणाधिकारी असतात. आता इतरांनाही विपश्यना साधनेचा लाभ मिळावा, या उद्देशाने पाथरट येथे हे विपश्यना केंद्र उभारले जाणार आहे. यासाठी रविवार, १६ रोजी १ ते ४ या वेळेत मुंबई, पुणे, कोल्हापूर येथील ज्येष्ठ विपश्यना गुरू या भूमीवर उपस्थित राहणार असून, या केंद्राच्या उभारणीसंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील विपश्यना साधकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘कोकण विपश्यना मेडिटेशन सेंटर’चे विश्वस्त संतोष आयरे तसेच युगंधरा राजेशिर्के यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
कोकण, गोवासाठी पाली येथे होणार विपश्यना केंद्र
By admin | Updated: November 16, 2014 00:24 IST