शिवाजी गोरे -- दापोली -डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठांतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभवातून कृषीरत्न गटाच्या विद्यार्थिनींनी खेर्डी गावात कृषी पर्यटनातून ग्रामविकासचं रोल मॉडेल साकारलं आहे. कृषी कार्यानुभवाच्या विद्यार्थिनींनी साकारलेल्या या मॉडेलचे कौतुक होत असून, आदर्श गावाची या विद्यार्थिनींनी मांडलेली संकल्पना पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे.कृषी पर्यटनातून ग्रामविकास ही संकल्पना कोकणात राबविण्यात आली तर कोकणातील प्रत्येक गावात कृषी पर्यटनाच्या माध्यमातून चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो. आदर्श गाव कसा असावा, कोकणातील लाखी बाग, शेती, पाणी नियोजन, केल्यास कोकणातील शेतकऱ्याला कृषी पर्यटनातून चांगला रोजगार मिळू शकतो. मात्र, त्याकरिता योग्य नियोजनाची गरज आहे. आंबा, काजू, नारळ ही कोकणातील मुख्य पिके आहेत. त्याचबरोबर भात हे पारंपरिक पीकही कोकणातील शेतकरी घेत आहेत. कोकणात विविधता असूनदेखील कोकणातील शेतकरी अजूनही मागासलेला आहे. आधुनिक तंत्रज्ञान, सुधारीत बियाणे व योग्य नियोजन केल्यास कोकणातील शेतकरीही समृद्ध होऊ शकतो. मात्र, त्याकरिता प्रत्येक गावाचा विकास आराखडा तयार करुन कृषी पर्यटनाची जोड शेतीला दिल्यास आदर्श गावाची संकल्पना प्रत्यक्षात साकार होऊ शकते. हे रोल मॉडेल स्वाती जाधव (गटप्रमुख), योगिता पवार, प्रज्ञा लोकरे, पूजा घोरपडे, प्राजक्ता घाडगे, तेजश्री गाढवे, अश्विनी कोसले, अनुनयना जॉन, स्वाती बनसोडे, अन्वेशा सिंग, झिन्नत महाबले, नयन दडस, दीप्ती दिसले या विद्यार्थिनींनी बनविले आहे. या मॉडेलचे उद्घाटन अशोक निर्बाण, प्रमोद सावंत, सरपंच अनिल जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या मॉडेलमध्ये विविध उपाय सुचविण्यात आले असून, कृषी पर्यटनातून ग्रामविकास सुत्राचा अवलंब केल्यास आदर्श गाव निर्माण करणे शक्य असल्याचे सरपंच अनिल जाधव यांनी यावेळी सांगितले.
खेर्डीत ग्रामविकासाचे ‘रोल मॉडेल’
By admin | Updated: August 26, 2016 23:17 IST