खारेपाटण : कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावी पशुवैद्यकीय दवाखान्यात सध्या कर्मचाऱ्यांची वानवा असून मुख्य पशुधन विकास अधिकारी श्रेणी १ चे पद रिक्त असण्याबरोबरच इतरही कर्मचारीवर्गाची कमतरता असल्यामुळे कधी फोंडा तर कधी कुरुंगावणे येथील पशुधन पर्यवेक्षक यांच्याकडे अतिरिक्त चार्ज देऊन तात्पुरते कामकाज चालविले जात आहे. तर स्वतंत्र दवाखान्याची इमारत नसल्यामुळेही गैरसोय होत आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, खारेपाटण गावात मुख्य ५ महसुली गाव असून खारेपाटण, शिवाजीपेठ, बंदरगाव, काजीर्डा, संभाजीनगर तसेच चिंचवली व वायंगणी आदी जवळजवळ ७ गावांसाठी खारेपाटण येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर असून सध्या खारेपाटण ग्रामपंचायत मालकीच्या इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात दवाखाना गेली बरीच वर्षे सुरु आहे. मात्र एवढे सात महसुली गावातील शेतकरी बांधवांच्या पशुधनाकरीता अद्यापही पशुधन विकास अधिकारी श्रेणी १ हे पशुवैद्यकीय डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.येथूनच जवळ असलेल्या कुरुंगावणे येथील पशुधन पर्यवेक्षक भुते यांच्याकडे खारेपाटणचा चार्ज देण्यात आला असून गेली सात वर्षे ते प्रामाणिक सेवा या पंचक्रोशीत करीत आहेत. मात्र शासनाच्या १९८४ च्या अॅक्टनुसार या कर्मचारी वर्गाला पशु व गुरांच्याबाबतीत शवविच्छेदन करणे किंवा अहवाल देणे, प्रमाणपत्र देणे आदी कोणताही अधिकारी नसल्याचे समजते. त्यामुळे एखादी गुरांच्या बाबतीत संभाव्य मोठी साथ निर्माण झाल्यास किंवा सर्पदंश झाल्यास तज्ज्ञ डॉक्टरला बोलावूनच योग्य निदान करावे लागते. तर कणकवली तालुक्यात फक्त ३ असे पशुवैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले असून त्यापैकी १ अधिकृत तर २ तात्पुरत्या स्वरूपात नेमुणका दिलेले आहेत. वरील डॉक्टरांच्या निरीक्षणाखालीच गावातील डॉक्टरांनी अर्थात पशुधन पर्यवेक्षकांनी काम करावयाचे असताना कणकवली तालुक्यात तीन डॉक्टर कोणकोणत्या पशुवैद्यकीय दवाखान्यांना किती भेटी देणार हा संशोधनाचा विषय आहे.खारेपाटणमध्ये सध्या फोंडा येथील डॉ. ए. जी. गायकर (श्रेणी १) यांची नुकतीच प्रमोटेड पशुधन विकास अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली असून ही तात्पुरत्या स्वरुपाची असल्याचे समजते. कारण पूर्ण फोंडाघाट गाव त्यांच्याकडे असून फोंडा येथे काही दिवस व खारेपाटणमध्ये काही दिवस काम करायचे असे त्यांना वरिष्ठांकडून सांगण्यात आले आहे. परंतु हे जरी खरे असले तरी पदोन्नतीतून डॉक्टर झालेले डॉ. गायकर यांना पूर्ण अधिकार नसल्याचे समजते. म्हणजेच तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी श्रेणी १ असणारे डॉक्टर पशुवैद्यकीय दवाखान्यात आवश्यक असून त्यांची नेमणूक येथे केली जात नाही ही शोकांतिका आहे. आजपर्यंत खारेपाटणला अधिकाऱ्यापासून प्रशासनाने दुर्लक्षित ठेवले असून शेतकऱ्यांचे पशुधन वाढण्याबरोबरच शेतकऱ्यांमध्ये सुबत्ता येण्यासाठी अशा डॉक्टरांची खारेपाटणमध्ये गरज आहे.खारेपाटणमध्ये पशुवैद्यकीय दवाखान्याची स्वतंत्र इमारत असतानाही ग्रामपंचायतीच्या दहा बाय दहा खोलीत सध्या दवाखाना सुरु आहे. त्याचबरोबर पशुधन विकास अधिकारी श्रेणी १ या पदाबरोबरच प्रणोपचार (ड्रेसर) १ पद, शिपाई १ पद अशी पदे रिक्त असून सध्या कुरुंगावणे येथील डॉ. भुते व एक शिपाई फक्त कार्यरत आहेत. शेतकऱ्यांच्या गायी, म्हैशी, बैल, शेळ्या, मेंढ्या, कोंबडी तसेच इतर पाळीव प्राण्यासाठी एवढा कर्मचारीवर्ग अपुरा असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभिर्याने लक्ष देऊन खारेपाटणमधील शेतकरी बांधवांवर होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी जनतेतून केली जात आहे. तर खारेपाटणमध्ये सुसज्ज असा सर्व सोयीनीयुक्त पशुवैद्यकीय दवाखाना उभारण्यात यावा अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. (वार्ताहर)
पशुवैद्यकीय दवाखाना रामभरोसे
By admin | Updated: August 11, 2014 00:20 IST