वायंगणी : केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ मोहिमेंतर्गत येथील जागृती मंडळाने आयोजित केलेल्या ‘स्वच्छ विद्यालय’ स्पर्धेत केंद्रशाळा वेंगुर्ले नं. १ या प्रशालेला ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ हा पुरस्कार प्राप्त झाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संजय मालवणकर यांनी दिली. जागृती मंडळाने यापूर्वीही शासनाच्या विविध योजनांचा व मोहिमेचा प्रचार व प्रसार केला आहे. केंद्राचा ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ या मोहिमेतही जागृती मंडळाने सहभाग घेतला होता. २ ते १७ आॅक्टोबर २०१४ या कालावधीत ज्या प्राथमिक शाळा सहभागी होऊन उत्कृष्ट कार्य करतील, त्यापैकी एका शाळेची मंडळाच्या ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ स्पर्धेसाठी निवड करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार हा पुरस्कार वेंगुर्ले येथील केंद्र शाळा नं. १ ने पटकाविला. रोख १००१ रुपये आणि सन्मानपत्र देऊन या शाळेला एका कार्यक्रमात लवकरच गौरविण्यात येणार आहे. ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ अभियानांतर्गत केंद्र शाळा वेंगुर्ले नं. १ ने अभियानाच्या जागृतीसाठी शिक्षक व विद्यार्थ्यांची शहरात फेरी काढली. स्वच्छता या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी शाळेच्या आवारात साफसफाई केली. वाडीवस्तीवर नेमलेल्या शाळेच्या स्वच्छतादूतांनी गृहभेटी घेतल्या व स्वच्छतेबद्दल मार्गदर्शन केले. शिक्षकांनी स्वच्छतेचे संदेश फलकावर लिहून विद्यार्थ्यांना त्याची माहिती करून दिली. शाळेतील मीना राजू मंचच्या विद्यार्थ्यांनी पोस्ट कार्डद्वारे संदेश लेखन केले व स्वच्छतादूतांकरवी त्याचा प्रसार करण्यात आला. शाळेमध्ये स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याच्या सुविधांची उपलब्धता या उपक्रमांमध्ये स्वच्छतेचे संदेश, पाणी निर्जंतुकीकरण, स्वच्छतागृहाची स्वच्छता याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. माता, पालक मेळाव्यात संगीतातून स्वच्छतेविषयी जागरूकता करण्यात आली. क्रीडांगणाची स्वच्छता व खेळाच्या साहित्याची देखभाल करण्यात आली. आरोग्यासाठी हातधुवा दिन साजरा करण्यात आला. या संपूर्ण अभियानाचे शाळेमध्ये नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका प्राची आंगणे यांनी केले. या सर्व उपक्रमांना शाळेच्या शिक्षिका कोमल पाटील, माधुरी परब, शमा कडुलकर, सानिका कदम, तमन्ना अत्तार यांचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)
स्वच्छता मोहिमेत वेंगुर्ले शाळा प्रथम
By admin | Updated: October 29, 2014 00:13 IST