सावंतवाडी : चार दिवसांपूर्वी येथील मोती तलावात मिळालेल्या सायकलचे गूढ गुरूवारी उलगडले आहे. आज गुरुवारी सकाळी तलावात एका युवकाचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यावरून हा मृतदेह त्या सायकलस्वाराचाच असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. या मृतदेहाची ओळख उशिरापर्यंत पटली नव्हती. मात्र, काही स्थानिकांनी ही व्यक्ती तलावाच्या काठी चार दिवसांपूर्वी बसली होती असल्याचे सांगितले आहे. त्यावरून याचा पोलीस शोध घेत आहेत. याबाबत माहिती अशी की, चार दिवसांपूर्वी येथील मोती तलावात सारस्वत बँकेसमोर एक सायकल कापडी पिशवीसह आढळून आली होती. पोलिसांनी या सायकलसह पिशवी ताब्यात घेतली. सावंतवाडी पालिकेकडे अत्याधुनिक बोटी नसल्याने तसेच बोटींना छिद्र पडल्याने तलावात शोधाशोध करण्यात आली नव्हती दरम्यान, गुरूवारी सकाळी तलावातच पॉम्पस हॉटेल नजीक मृतदेह आढळून आला. हा मृतदेह एका युवकाचा असून, त्याच्या अंगावर कोणत्याही खुणा नाहीत. मात्र, पायात मोजे होते. या युवकाचे अंदाजे वय ३५ वर्षे असल्याचे पोलिसांचे मत आहे. हा मृतदेह चार दिवसापूर्वींचा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर त्या युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील कुटिर रूग्णालयात हलविण्यात आला आहे.उशिरापर्यंत या मृतदेहाची ओळख पटली नव्हती. पोलिसांनी स्थनिकांना या मृतदेहाचा फोटो दाखवल्यानंतर अनेकांनी हा युवक चार दिवसांपूर्वी तलावाकाठी बसला होता, असे स्पष्ट केले. तर पोलिसांनी हा सायकलस्वार असावा, त्यानेच ही सायकल तलावात टाकून त्यानंतर आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)
मोती तलावातील सायकलचे गूढ उलगडले
By admin | Updated: July 31, 2014 23:31 IST