कणकवली : वारगांव येथे बुधवारी सायंकाळी आयशर टेम्पोने इको स्पोर्ट कारला दिलेल्या धडकेत दोघे जागीच ठार झाले. तर तिघे गंभीर जखमी झाले. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील वारगांव पिकअपशेडनजीक हा अपघात घडला. कारमधील श्वेता चारूहास आंजुर्लेकर (वय ५६) आणि पूनम मिलन आंजुर्लेकर (वय ५६) या दोन महिला जागीच ठार झाल्या. तर संध्या कोरगांवकर (वय ३५), सुधीर कोरगांवकर (वय ३९) आणि चारूहास आंजुर्लेकर (वय ५७, सर्व रा.गोरेगांव, मुंबई) हे जखमी झाले. हे सर्व मालवण तारकर्ली येथे जात होते. सिद्धी रोडवेजचा आयशर टेम्पो (एम.एच.-०५-ए९८५९) गोव्याहून मुंबईकडे काजू साले घेऊन जात होता. आयशर टेम्पोने वारगांव पिकअप शेडनजीक समोरून चालणार्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न केला. याचवेळी मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणार्या इको स्पोर्ट गाडीला (एम.एच.-०२-डीजे-२९६९) जोरदार धडक बसली. अपघातानंतर घटनास्थळी रक्ताचा सडा पसरला होता. अपघाताचे वृत्त समजताच जिल्हा परिषद सदस्य रत्नप्रभा वळंजू, रमाकांत राऊत, वारगांव सरपंच एकनाथ कोकाटे, इरफान मुल्ला, किशोर सावंत, नंदू शिर्सेकर आदींनी धाव घेतली आणि जखमींना रूग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. जखमींना कणकवली येथे उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चारूहास आंजुर्लेकर यांना कणकवलीत खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर संध्या व सुधीर कोरगांवकर यांना गोवा-बांबुळी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)
वारगांवात भीषण अपघातात दोन ठार; तीन जखमी
By admin | Updated: May 15, 2014 00:26 IST