कणकवली : सतत सहा विधानसभा निवडून येत सिंधुदुर्ग जिल्ह्यावर प्रभाव राखणाऱ्या नारायण राणेंची विजयाची परंपरा या निवडणुकीत खंडीत झाली. कॉँग्रेसची सत्ताही गेली आहे. मात्र, आता आमदार नीतेश राणेंनी नारायण राणेंच्या पुनर्वसनाचा प्रयत्न चालवला आहे. आमदार विजय सावंत यांची आमदारकी नारायण राणे यांना मिळावी, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सलग २५ वर्षे निवडून येत आमदार म्हणून नारायण राणे यांनी सिंधुदुर्गातील राजकारणात वर्चस्व गाजवले. या निवडणुकीत त्यांचा पराभव शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी केला. राज्यातील कॉँग्रेसची सत्ता संपुष्टात आल्याने पद मिळवण्याची संधी उणावली आहे. नारायण राणे यांचा पराभव झाला. परंतु त्यांचे पुत्र नीतेश राणे कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडून येत आमदार झाले. नारायण राणे यांचा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. नीतेश राणे यांनी मात्र नारायण राणे यांना आमदारकी मिळवून देण्यासाठी मार्ग शोधला आहे. आताच्या निवडणुकीत कणकवली मतदारसंघातूनच नीतेश राणे यांच्या विरोधात कॉँग्रेसचे बंडखोर आमदार विजय सावंत उभे ठाकले होते. नारायण राणे आणि विजय सावंत यांच्यात निवडणुकीच्या आधी साखर कारखान्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. साखर कारखान्याला नारायण राणे यांच्याकडून झालेल्या विरोधातून विजय सावंतही इरेस पेटले होते. त्यांनी साखर कारखान्याची मंजुरी मिळवत राणेंवर कडी केली. त्यानंतर न्यायालयीन डावपेचातही विजय सावंत यांच्या बाजूने निकाल लागला. मात्र, या विरोधाने विजय सावंत यांनी कॉँग्रेसच्या अधिकृत उमेदवार नीतेश राणे यांचा पराभव करण्याचे बोलून दाखवत निवडणुकीत बंडखोरी केली. त्यांच्या बंडखोरीचा नीतेश राणे यांच्या विजयावर कोणताही फरक पडला नाही. मात्र, आता आमदार नीतेश राणे यांनी एका दगडात दोन पक्षी मारण्याचे ठरवले आहे.आमदार म्हणून विजय सावंत यांनी कॉँग्रेस वाढवण्याचा प्रयत्न केलेला नाही. याऊलट या विधानसभा निवडणुकीत विजय सावंत यांनी बंडखोरी केली. अधिकृत उमेदवाराला पाडण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न केले. ठाणे ते सिंधुदुर्ग पट्ट्यात आपणच आमदार म्हणून निवडून आलो. कॉँग्रेस बळकट करायची असल्यास तशी ताकद पक्षाने देणे गरजेचे आहे. त्यासाठी आमदार विजय सावंत यांची विधानपरिषदेची आमदारकी काढून घेऊन ती योग्य माणसाकडे द्यावी, अशी मागणी पक्षाकडे करणार असल्याचे नीतेश राणे यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत बोलून दाखवले आहे. नीतेश राणे ‘योग्य’ माणूस म्हणून नारायण राणे यांच्यासाठीच लॉबिंग करतील, हे वेगळे सांगायला नको. यासाठी नीतेश राणे यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यापर्यंत जाण्याचे बोलून दाखवले आहे. (प्रतिनिधी)
एकाच दगडात दोन पक्षी
By admin | Updated: October 29, 2014 00:13 IST