वैभववाडी : विकास केवळ आमदार, खासदार निधीतूनच केला जातो असे नाही, तर त्यासाठी इच्छाशक्ती असावी लागते. विकास करण्याची इच्छाशक्ती असेल तर खासगी क्षेत्रातून निधी उभारून सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडविले जाऊ शकते. याच इच्छाशक्तीच्या जोरावर वैभववाडीतील जनतेच्या स्वप्नांना आकार देण्याचा आपला प्रयत्न राहील. त्यासाठी तालुक्यातील संपूर्ण जनतेची साथ आवश्यक आहे, असे मत काँग्रेसचे उमेदवार नीतेश राणे यांनी ‘व्हिजन डॉक्युमेंटरी’ प्रदर्शनावेळी व्यक्त केले.वैभववाडी ‘व्हिजन २०२५’ या चित्रफितीचे प्रदर्शन डॉ. राजेंद्र पाताडे यांच्या कंपांऊंडमध्ये करण्यात आले. यावेळी दिगंबर पाटील, जयेंद्र रावराणे, विकास काटे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, अरविंद रावराणे, भालचंद्र साठे, नासीर काझी आदी उपस्थित होते.राणे म्हणाले, वैभववाडीतील उपलब्ध साधनसंपत्तीचा उपयोग करून तालुकावासियांच्या जीवनात क्रांती घडवली जाऊ शकते. त्यादृष्टीने आपले नियोजन सुरू केले आहे. त्याचप्रमाणे पर्यटनस्थळांचा विकास करून रोजगार निर्मिती करून देण्याचा मानस आहे. दर्जेदार मुलभूत सोयीसुविधा निर्माण करताना निधीची मर्यादा अथवा अन्य कोणत्याही सबबी सांगून पळ काढणाऱ्यांपैकी मी नाही. त्यामुळे पुढील १० वर्षात वैभववाडी तालुका विकासात अग्रेसर असेल हे समाजातील सर्व घटकांपुढे मांडता यावे यासाठीच ‘व्हिजन २०२५’ ही डॉक्युमेंटरी तयार केली आहे.ते म्हणाले, जगातील कोणीही श्रीमंत माणूस किंवा मोठा नेता तुमच्या आयुष्यातील वाया गेलेली मागची ५ वर्षे पुन्हा आणून देऊ शकत नाही. त्यामुळे मागील चुकांमधून बोध घेऊन भविष्यकाळ उज्ज्वल बनविण्यासाठी आपण मला साथ द्यावी. प्रत्येक दिवस मी नवी संधी समजतो. त्यामुळे प्रवाहाच्या विरूद्ध जाऊन यश मिळविण्याची सवय आहे. त्यामुळे वैभववाडीच्या भवितव्याची जबाबदारी माझ्यावर सोडा. चित्रफितीद्वारे मांडलेल्या सर्व गोष्टी पुढच्या १० वर्षात करून दाखविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी शासकीय निधीवर विसंबून न राहता त्यासाठी खासगी क्षेत्रांचा सहभाग घेईन, असा विश्वास नीतेश राणे यांनी व्यक्त केला.या कार्यक्रमाला डॉक्टर्स, वकील, व्यापारी, शिक्षक, विद्यार्थी असे सर्व क्षेत्रातील लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जनतेच्या स्वप्नांना आकार देण्याचा प्रयत्न
By admin | Updated: October 6, 2014 22:36 IST