सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंद्यांवर छाप्यांचे सत्र सुरू असतानाच सोमवारी रात्री गोव्याहून औरंगाबादकडे गोवा बनावटीची दारू घेऊन जाणारा ट्रक ओरोस येथील विशेष पथकाच्या पोलिसांनी आंबोलीनजीक पकडला. या ट्रकची दारूसह किंमत २१ लाख ७६ हजार रुपये होत असून, दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेल्या आठवड्यातील अवैध धंद्यांवर पोलिसांनी केलेली ही तिसरी मोठी कारवाई आहे.गोव्याहून निघालेला हा ट्रक (एमएच २३ डब्लू ११३१) आंबोलीमार्गे औरंगाबादकडे चालल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक गीतकुमार शेवाळे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सोमवारी रात्री दहाच्या सुमारास त्यांनी माडखोलजवळ सापळा रचला. माहितीप्रमाणे हा ट्रक १०.३० च्या सुमारास माडखोलजवळ आला. पोलिसांनी या ट्रकचा पाठलाग केला. ट्रकला दाणोलीजवळ प्रथम थांबवण्याचा प्रयत्न केला. तो अयशस्वी झाल्यानंतर या ट्रकला आंबोलीत अडविले. या ट्रकमधील संजय जयमाजी काळे (वय ४०) आणि रुक्माजी महादेव काळे (२०, दोघेही रा. धनगरमांडणी ता. बासरणी, जि. नांदेड) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोव्यात भरून दिलेली ही दारू औरंगाबाद येथे पोहोचविण्यास सांगण्यात आल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी या ट्रकची झडती घेतली असता या ट्रकच्या मागच्या बाजूस ठेवलेल्या मोकळ्या बॉक्सच्या आतील बाजूस ोवा बनावटीच्या रॉयल दारूचे ९८० बॉक्स होते. याची बाजारभावाप्रमाणे किंमत ११ लाख ७६ हजार इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. दारु नेणारा ट्रकही पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक गीतकुमार शेवाळे, हेडकॉन्स्टेबल प्रताप नाईक, मनीष शिंदे, रोहन सावंत, मनोज गुरव, सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)अधीक्षकांचे लक्ष आंबोली व इन्सुली दूरक्षेत्रावरगोवामार्र्गे होणारी दारू वाहतूक ही बांदा, तसेच आंबोली दूरक्षेत्रावरून होत असल्याने पोलीस अधीक्षकांनी या दोन दूरक्षेत्रांवर विशेष लक्ष देण्याचे ठरवले असून, येथील कर्मचाऱ्यांची सर्व माहिती जमा करण्याचे काम सुरू केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दारूने भरलेला ट्रक पकडला
By admin | Updated: July 8, 2015 00:14 IST