मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात किंबहुना मालवणात ख्रिसमस व थर्टी फर्स्ट सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची रिघ असताना शासनाचा पर्यटन महोत्सव रद्द होणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. या महोत्सवासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार अशी माहिती शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिली.शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी शनिवारी शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, बबन शिंदे, नंदू गवंडी, किसन मांजरेकर, गौरव वेर्लेकर, हरी खोबरेकर आदी उपस्थित होते. नाईक म्हणाले, हिवाळी अधिवेशनात जिल्ह्यातील अनेक समस्या मांडल्या. प्रामुख्याने आरोग्याच्या मुलभूत प्रश्नांविषयी चर्चा करण्यात आली. रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आहे. ग्रामीण रुग्णालयांमध्ये एनआरएमअंतर्गत डॉक्टर्स उपलब्ध व्हावेत यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासमवेत आपण जिल्हा रुग्णालयांची भेट घेणार आहोत. जिल्ह्याच्या किनारपट्टीवर खाडीक्षेत्र परिसरात बंधारे उपलब्ध नाहीत तर असलेले बंधारे निकृष्ट दर्जाचे आहेत. याबाबत खारलँड विभागाशी चर्चा झाली आहे. बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले असून दुरुस्तीचा अहवाल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठविणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.जिल्हा प्रशासनाने मोठा गाजावाजा करून २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत सिंधु महोत्सवाचे मालवणात आयोजन होईल असे महिन्याभरापूर्वीच जाहिर केले होते. मात्र सरत्या वर्षाला निरोप द्यायची वेळ आली असताना जिल्हा प्रशासन महोत्सवाच्या तारखांमध्ये बदल करते. याबाबत नाराजी व्यक्त करीत जानेवारीत महोत्सव घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
पर्यटन महोत्सव रद्द होणे दुर्दैवाची गोष्ट
By admin | Updated: December 28, 2014 00:11 IST