रेडी : पावसाळी हंगामाचा शेवट जवळ आल्याने रेडी गावात पर्यटकांची वर्दळ आता वाढायला सुरुवात झाली आहे. देशी पर्यटकांची पावले आता मोठ्या प्रमाणावर रेडी गावाच्या दिशेने फिरकायला लागली असून पर्यटकांचा हंगाम सुरू झाल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. परंतु रेडी परिसरात येणारे देशी पर्यटक येथे पुरेशा सुखसुविधा उपलब्ध नसल्याने दिवसभर फिरून राहण्यासाठी नजीकच्या गोवा राज्यात जात आहेत.वेंगुर्ले तालुक्यातील रेडी हे गाव पर्यटनाच्या दृष्टीने जगाच्या नकाशावर पोहोचले आहे. रेडी बंदरात चालणाऱ्या मायनिंग आणि खनिज वाहतुकीच्या बंदरामुळे हे बंदर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बनत आहे. रेडी गावात आल्यानंतर प्रथम श्री सत्यपुरुषाचे आकर्षक असे मंदिर दृष्टीपथात पडते. तसेच रेडी गावात पुढे आल्यानंतर येथील जागृत आणि भक्तांच्या हाकेला, नवसाला पावणारा स्वयंभू महागणपती, स्वयंभू श्री माऊली मंदिर, श्री सिध्देश्वर मंदिर, येथील स्वच्छ व सुंदर रमणीय सागर किनारा, कनयाळे येथील माड बागायतीमधील हनुमान मंदिर, नवदुर्गा मंदिर, पांडवकालीन कोरलेली हत्तीची सोंड, गुहा, जाते, श्री घंगाळेश्वर मंदिर व कर्पेवाडीतील स्वामी समर्थांचे मंदिर, साईबाबा मंदिर, विठोबा रखुमाई मंदिर व समुद्रानजीक असलेले रेडी बंदर परिसर हे देशी पर्यटकांचे मन वेधून घेत आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून सध्या विदेशी पर्यटक देवदर्शन व नैसर्गिक आकर्षक पर्यटनस्थळे पाहण्यासाठी रेडीमध्ये दाखल होण्यास सरुवात झाली आहे. येथे येणारे पर्यटक येथील पर्यटनावर बेहद खुश होत आहेत. सध्या कोल्हापूर, सांगली, सातारा, कऱ्हाड, पुणे, बेळगाव, कारवार व गोवा राज्यातील देशी पर्यटकांची रेडी परिसरात वर्दळ वाढायला सुरुवात झाली आहे. या देशी पर्यटकांना येथील पर्यटनाबाबत छेडले असता ते म्हणतात, सिंधुुदुर्ग व रेडी किनारपट्टी म्हणजे निसर्ग सौंदर्याची खाण आहे. येथील स्वच्छता पाहून विदेशातील समुद्रकिनारे फिके वाटतात. येथील समुद्र किनाऱ्यावरील स्वच्छता अशीच कायमस्वरुपी टिकून राहण्यासाठी सर्व पर्यटकांनी व ग्रामस्थांनी प्रयत्नशील रहावे. जेणेकरून आगामी काळात येथील पर्यटन व्यवसायाला चांगले दिवस येतील. (वार्ताहर)वास्तव्यासाठी गोव्याला पसंतीरेडी येथील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भारावून टाकते. मात्र, सोयीसुविधांच्या बाबतीत मोठी कमतरता भासत असल्यामुळे देशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर नाराज असतात. परिणामी ते राहण्यासाठी नजीकच्या गोवा राज्यात जातात. त्यामुळे आगामी काळात येथील प्रशासनाने व पर्यटन विभागाने येथील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन समुद्र किनारी राहण्यासाठी, खाण्यापिण्यासाठी, चांगल्या सुविधा दिल्या तर भविष्यात सोयीसुविधांच्या अभावामुळे गोव्याला जाणारे पर्यटक येथे वास्तव्य करतील. त्यामुळे स्थानिकांना रोजगार प्राप्ती होणार आहे. मात्र, तशाप्रकारच्या सुखसुविधा देण्यासाठी प्रशासनाने लोकांना हाताशी धरून नियोजन करणे आवश्यक आहे. पर्यटकांचे हे प्रातिनिधिक मत पर्यटनाच्या बाबतीत खूप काही सांगणारे आहे. त्यामुळे आगामी काळात रेडी परिसरात व प्रामुख्याने किनारपट्टी भागात पुरेशा सुखसुविधा निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे.
पर्यटकांची वर्दळ सुरू रेडी येथील स्थिती :
By admin | Updated: September 11, 2014 23:10 IST