कुडाळ : कुडाळ तालुक्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. तेर्सेबांबर्डे येथील उषा सुधाकर पाटील हिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. कुडाळ येथील समीक्षा खेडेकर या महिलेचा वाडीवरवडे येथे अपघाती मृत्यू झाला, तर पॉवर टिलरमध्ये पाय अडकून जखमी झालेल्या उत्तम दाभोलकर (वय ६०, रा. दाभोली) यांचा कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कुडाळ तालुक्यासाठी आज, शनिवार हा दिवस घातवार ठरला आहे. कुडाळ येथे राहणारे सुनील खेडेकर (रा. कुडाळ-लक्ष्मीनगर) हे काल, शुक्रवारी सायंकाळी पत्नी समीक्षा खेडेकर हिच्यासह वेंगुर्लेहून कुडाळ येथे येत होेते. वाडीवरवडे येथे मोटारसायकलसमोर कुत्रा आडवा आल्याने झालेल्या अपघातात खेडेकर दाम्पत्य गंभीर जखमी झाले. त्यांना कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु अधिक उपचारांसाठी गोवा येथे हलविताना बांदा येथे समीक्षा खेडेकर यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे. दरम्यान, तेर्सेबांबर्डे येथील उषा सुधाकर पाटील (वय ६२) या महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. तिच्या साडीच्या टोकाला बांधलेल्या चिठ्ठीच्या आधारे कुडाळ पोलीस अधिक तपास करीत आहेत. दाभोली-तेलीवाडी येथील विठ्ठल आरोलकर यांच्या मालकीचा शेत नांगरणीचा पॉवर टिलर हरिजनवाडी येथील उत्तम दत्ताराम दाभोलकर (वय ६०) यांनी भाड्याने घेतला होता. आज, सकाळी वेंगुर्ले तालुक्यातील आवेरे गावातील रामचंद्र मांजरेकर यांच्या शेतीत उत्तम दाभोलकर हे सकाळी आठच्या सुमारास नांगरीत होते. यावेळी त्यांचा पाय पॉवर टिलरमध्ये अडकून तुटला. उपस्थित ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. (प्रतिनिधी)
कुडाळमध्ये विविध घटनांत तिघांचा मृत्य
By admin | Updated: November 2, 2014 00:46 IST