मालवण / गुहागर : मालवण येथील सर्जेकोट बंदरातून सात दिवसांपासून नौकेसह बेपत्ता झालेले तीन मच्छिमार रत्नागिरी येथील दाभोळ बंदरात सुरक्षित पोहोचले आहेत. मागील काही दिवसांपासून खराब समुद्री हवामानामुळे बेपत्ता मच्छिमारांबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या. या मच्छिमारांच्या शोधकार्याबाबत स्थानिक मच्छिमारांमधून दबाव वाढत होता. तिन्ही मच्छिमार सुखरूप असल्याचे समजताच प्रशासन आणि मच्छिमारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.सर्जेकोट येथून संभाजी पराडकर यांची सुहासिनी नौका घेऊन दशरथ पेडणेकर, दिनकर जोशी, सुभाष कुर्ले हे तिघे खलाशी २३ आॅक्टोबरला दुपारी अडीच वाजता सर्जेकोट बंदरातून मासेमारीसाठी समुद्रात गेले होते. त्यानंतर त्यांचा ठावठिकाणा समजून येत नव्हता. आज, बुधवारी रत्नागिरी येथील दाभोळ बंदरात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छिमारांना सुहासिनी नौका आढळून आली. त्यांनी ही नौका सुरक्षित बंदरात घेऊन येत मालवण येथे संपर्क साधला. दरम्यान आज, सकाळी स्थानिक मच्छिमारांनी पोलीस निरीक्षक विश्वजित बुलबुले यांची भेट घेऊन बेपत्ता मच्छिमारांच्या शोधकार्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप करीत जाब विचारला होता. यावेळी संभाजी पराडकर, विकी तोरस्कर, बाबी जोगी, दादा सावजी, गंगाराम आडकर, दशरथ पराडकर, दाजी कोळंबकर, आबू आडारकर, नारायण परूळेकर, धु्रवबाळ खोंडबा, संदीप शेलटकर, शैलेंद्र सावजी यांच्यासह अन्य मच्छिमार उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘ते’ खलाशी नौकेसह सुखरूप
By admin | Updated: October 30, 2014 00:46 IST