कणकवली : सातत्याने राजकीय बदल होत असले तरी अपक्ष किंवा कोणालाही पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचा उमेदवार माघार घेणार नाही, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी येथील पत्रकार परिषदेत दिले. यावेळी शिवसेनेचे उमेदवार सुभाष मयेकर, गौरीशंकर खोत, तालुकाप्रमुख सचिन सावंत, विलास साळसकर, अनिल हळदिवे आदी उपस्थित होते. कणकवली विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे सिद्धिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर यांनी कणकवलीत अर्ज दाखल केला. राऊत म्हणाले की, राज्यात युती तुटली असली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात युती टिकून रहावी यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. भाजपाने पूर्ण जिल्ह्यासाठी तसा प्रस्ताव ठेवणे अपेक्षित होते. दोन मतदारसंघात युती आणि एकात नाही, असे समीकरण होऊ शकत नाही. त्यामुळे दोन मतदारसंघ शिवसेनेसाठी आणि एक भाजपासाठी असे जुने सूत्र शक्य होते. शिवसेना कार्याध्यक्ष उदधव ठाकरे यांच्याशी आम्ही फक्त सिंधुदुर्गसाठी चर्चा केली होती. मात्र, भाजपाकडून प्रस्ताव आला नाही. सावंतवाडीत भाजपाकडून माजी आमदार राजन तेली यांना देण्यात आलेल्या उमेदवारीचा दीपक केसरकर यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. कणकवली मतदारसंघात कॉँग्रेसचे आमदार विजय सावंत यांना आम्ही आॅफर दिली होती. मात्र, तत्पूर्वी ते अपक्ष म्हणून अर्ज दाखल करून मोकळे झाले. कॉँग्रेसची राजवट संपुष्टात आली आहे. २५ वर्षांनी प्रथमच सुभाष मयेकर यांच्या रूपाने देवगड, कणकवली, वैभववाडी या उपेक्षित तालुक्यांना हक्काचा उमेदवार मिळाल्याचे खासदार राऊत म्हणाले. विकासाच्या नावाखाली घरादारावर बुलडोझर कधीही फिरवला जाणार नाही. दडपशाही, दादागिरी, खून, मारामाऱ्या, गरीबांचे रक्त पिणारी औलाद गाडण्यासाठी कार्यकर्ता काम करेल, असे खासदार विनायक राऊत म्हणाले. (प्रतिनिधी)
कोणाच्याही पाठिंब्यासाठी माघार नाही
By admin | Updated: September 28, 2014 00:14 IST