कणकवली : शिडवणे येथील साखर कारखान्याचे भूमिपूजन २५ आॅगस्टपर्यंत करण्यात येणार असून या भूमिपूजन सोहळ्यास माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांसाठीच हा कारखाना असून त्याच्या उभारणीमध्ये कोणतेही राजकारण आणले जाणार नाही, असे सावंत शुगर अॅग्रो प्रॉडक्ट लिमिटेडचे संस्थापक चेअरमन आमदार विजय सावंत यांनी स्पष्ट केले. येथील संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत विजय सावंत बोलत होते. ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तसेच बेरोजगार तरुणांना या कारखान्यामुळे आर्थिक उन्नतीची संधी मिळणार आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी सध्या गाववार बैठका घेण्यात येत आहेत. जिल्ह्यामधील ऊस आजूबाजूचे साखर कारखाने वेळेत घेत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हक्काचा साखर कारखाना मिळावा यासाठी हा कारखाना सुरु करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे शेअर्सही या कारखान्यात असणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १.३० लाख टन ऊस उत्पादन होते. परंतु कारखान्यात ऊसाचे एकावेळी गाळप करण्यासाठी ३ ते ४ टन ऊसाची आवश्यकता असते. त्यामुळे कोल्हापूर येथील ऊस शेतकऱ्यांचीही १ आॅगस्ट रोजी बैठक घेऊन त्यांना या कारखान्याला ऊस देण्यासाठी उद्युक्त करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी ऊस लागवडीकडे वळत असून मुबलक पाणी नसल्यामुळे काही मर्यादा येत आहेत. ऊसाला पाणीपुरवठा होण्यासाठी धरणालगत कालवे होेणे गरजेचे आहे. देवधर प्रकल्प तसेच नाधवडे प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यास त्याठिकाणी असलेली १२ हजार एकर जमीन ओलिताखाली येवू शकेल. या कारखान्यात मे २०१५ मध्ये प्रायोगिक तत्वावर ऊस गाळप करण्यात येणार असून नोव्हेंबर २०१५ मध्ये हंगामी गाळप घेतले जाणार आहे. (वार्ताहर)कारखाना उभारणीतील अडचणी दूरराणे व्हेंचर विरूद्ध शासन असा दावा न्यायालयात सुरु आहे. या दाव्याशी आपला काहीही संबंध नाही. आपण उभारत असलेल्या साखर कारखान्याबाबत अडचणी दिल्लीतून दूर झाल्या आहेत. त्यामुळे आता कोणताही अडथळा येणार नसल्याचे आमदार सावंत यांनी सांगितले.सूत गिरणी उभारण्याचा मानसकणकवली तालुक्यातील तिवरे येथे सूतगिरणी उभारण्याचा आपला मानस आहे. त्याठिकाणी कापसापासून सूत व सुतापासून कापड तयार होणार आहे. त्यानंतर गारमेंट फॅक्टरीमध्ये कपडे तयार होतील. कळसुलीजवळील शिरवल येथे रेडिमेड गारमेंटच्या इमारतीचे काम सुरु केले असून कणकवली, देवगड, वैभववाडी या भागामध्ये १८ गारमेंट फॅक्टरी सुरु करण्यात येणार आहेत.
साखर कारखाना उभारणीत राजकारण नाही
By admin | Updated: July 29, 2014 23:00 IST