आचरा : मालवण तालुक्यातील तळाशील किनारपट्टीचा सुमारे पंधरा ते वीस फूट भूभाग समुद्राने गिळंकृत केला आहे. मुख्य रस्ता आणि समुद्र यामध्ये केवळ दहा फुटांचे अंतर राहिले असून, १५ घरांसह मुख्य रस्त्यालाही धोका निर्माण झाला आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी माजी सरपंच संजय केळूसकर यांनी केली आहे.एका बाजूने खाडीने आणि दुसऱ्या बाजूने समुद्राने वेढलेल्या तोंडवळी तळाशील भागाला पावसाळ्यात येणाऱ्या उधाणाचा दरवर्षी फटका बसत आला आहे. समुद्राच्या बाजूने दोन टप्प्यात बांधण्यात आलेल्या संरक्षक बंधाऱ्यामुळे तळाशीलचा काही भूभाग सुरक्षित असला, तरी पौर्णिमेला आलेल्या उधाणाचा फटका बसल्याने अंदाजे पंधरा फूट किनारपट्टीचा भूभाग समुद्राने गिळंकृत केला आहे. तळाशीलच्या मुख्य रस्त्यापासून काही फुटावरच समुद्र येऊन ठेपला आहे. त्यामुळे या भागातील घरांना धोका निर्माण झाला आहे.१५ घरांना धोका केळूसकर यांनी सांगितले की, तळाशील समुद्रकिनारी उर्वरित पाचशे मीटर संरक्षक बंधाऱ्याची गरज आहे. सध्याच्या उधाणामुळे बंधारा नसलेल्या किनारपट्टीचा भूभाग खचत चालला आहे. यामुळे या भागातील १५ घरांना धोका निर्माण झाला आहे. या मोसमातील अजून काही उधाणे बाकी आहेत. यामुळे तातडीने संरक्षक बंधारा बांधण्याची गरज निर्माण झाली आहे.
Sindhudurg: समुद्राने गिळली २० फूट किनारपट्टी, तळाशील भागातील घरांना धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 16:08 IST