सावंतवाडी : कोकणच्या जनतेने दहशतवादाच्या विरूद्धची लढाई जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. आता आम्हाला विकासाची लढाई जिंकायची आहे. यापुढे कोकणच्या विकासासाठी प्राण पणाला लावून काम करणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वास सार्थ ठरवणार, असे मत राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी माडले.राज्यमंत्री झाल्यानंतर दीपक केसरकर यांचा पहिला नागरी सत्कार सावंतवाडीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, शिवसेना आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष बबन साळगावकर, बेस्टचे चेअरमन अरुण दुधवडकर, माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, महिला आघाडी प्रमुख स्रेहा तेंडोलकर, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, संपर्कप्रमुख सिद्धी परब, जिल्हा परिषद सदस्या जान्हवी सावंत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे, नगरसेवक विलास जाधव, राजू बेग, किर्ती बोंद्रे, गोविंद वाडकर, देवेंद्र टेमकर आदी उपस्थित होते. राज्यमंत्री केसरकर म्हणाले, मी आता यापुढे सत्कार स्वीकारणार नाही. दुष्काळग्रस्तांसाठी काम करणार आहे. तेथील जनतेकडे जाणार असून त्यांना न्याय कसा देता येईल, हे बघणार आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सर्व ताकद पणाला लावीन. सावंतवाडी तसेच कोकणचा विकास होण्यासाठी जास्तीत जास्त निधी या भागात आणणार आहे, असे सांगत निवडणुकीत माझा पराभव करण्यासाठी अनेक आमिषे दाखवण्यात आली. पैशांचा पाऊस पाडण्यात आला पण येथील जनता नेहमीच माझ्यामागे राहिली, असेही यावेळी केसरकर यांनी सांगितले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापूर येथील राजू परूळेकर यांनी चांदीची तलवार भेट म्हणून दिली. तर सावंतवाडी नगरपालिकेच्या नगरसेविकांनी दीपक केसरकर यांच्या पत्नीचे औक्षण करीत ओटी भरली. यावेळी केसरकर यांना सन्मानपत्र देण्यात आले. त्याचे वाचन सुमेधा धुरी यांनी केले. महोत्सवासाठी सावंतवाडीतून मोठ्या प्रमाणात नागरिक आले होते. (प्रतिनिधी)विकासाची भूक केसरकरांना माहित : साळगावकरसावंतवाडी शहराचा विकास कशाप्रकारे केला पाहिजे, याची माहिती राज्यमंत्री म्हणून दीपक केसरकर यांना आहे. केसरकर कुटुंबीय यापूर्वी अनेक घाव सोसूनही कधीही मागे हटले नाही.नेहमीच जनतेमध्ये राहिले आणि त्यामुुळे आज हे चांगले दिवस बघायला मिळाले. हा तालुका गेली वीस वर्षे विकासापासून वंचित होता, असेही यावेळी नगराध्यक्ष साळगावकर म्हणाले.आजपर्यंत जिल्ह्यात येणाऱ्या मंत्र्यांचा सत्कार दीपक केसरकर करत होते. मात्र, आज प्रत्यक्षात मंत्री म्हणून केसरकर यांचाच सत्कार होत आहे. येथील जनतेच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद पहायला मिळत आहे. हा आनंद विकासातून दिसेल, असे मत आमदार वैभव नाईक यांनी मांडले.
दहशतवाद संपला विकासाची लढाई सुरु
By admin | Updated: December 26, 2014 00:22 IST