सिंधुदुर्गनगरी : वासरांना देण्यात येणाऱ्या ब्रुसेलोसिसच्या लसची मुदत संपल्याने १० हजार ९२० एवढ्या लसी शासनास परत कराव्या लागल्या आहेत. आतापर्यंत २१ हजार वासरांपैकी १० हजार ८० वासरांना ब्रुसेलोसिस लस देण्यात आली असून अद्यापही १० हजार ९२० वासरे या लसीपासून वंचित राहिली आहेत.गेल्या सात ते आठ वर्षांपासून पावसाळ््यात जिल्ह्यात अज्ञात तापाने धुमाकूळ घातला होता. त्यात कित्येकजणांचे बळी गेले होते. मात्र, हा ताप नेमका कोणता याबाबत काहीच स्पष्ट होत नव्हते. अखेर डेरवण संस्थेने यावर संशोधन करीत हा ताप ब्रुसेलोसिस या प्रकारचा असून तो जनावरांच्या मलमुत्रापासून व संपर्कात आल्याने होत असल्याचे संशोधनाअंती समोर आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील एक वर्षापर्यंतच्या आतील सर्व मादी वासरांना ब्रुसेलोसिसची लस द्यावी, असे शासनाने आदेश दिले होते. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २१ हजार मादी वासरांना लसीकरण मोहीम सुरू केली. त्यातच पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी असहकार आंदोलनाचे हत्यार उपसले होते. यामुळे हे लसीकरण पशु विभागातील पदवीधर विभागामार्फत केले जात होते. त्यानुसार जिल्ह्यात २१ हजार ब्रुसेलोसिसच्या लसी प्राप्त झाल्या होत्या. हे लसीकरण ३१ आॅगस्टपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, या कालावधीत लसीकरण पूर्ण न झाल्याने तब्बल १० हजार ९२० लसी या खराब झाल्याने त्या परत कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे सुमारे ११ हजार मादी वासरे या लसीपासून वंचित राहिली आहेत. त्या वासरांनाही लवकरच लसीकरण केले जाईल, अशी माहिती पशुविभागाकडून देण्यात आले.असहकार आंदोलन स्थगितप्रवास भत्ता मिळाला पाहिजे, प्रमोशन मिळाले पाहिजे आदी एकूण सहा मागण्यांच्या पूर्ततेसाठी पदवीकाधारकांनी असहकार आंदोलन पुकारले होते. यापैकी एक मागणी मान्य झाली होती. मात्र, आगामी विधानसभा निवडणुका विचारात घेता पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने आपले आंदोलन स्थगित केले आहे. १० जून २०१४ पासून असहकार आंदोलन सुरू केले होते. (प्रतिनिधी)
दहा हजार जनावरे लसींपासून वंचित
By admin | Updated: September 9, 2014 23:49 IST