प्रकाश काळे- वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या संगीत खुर्चीचा ‘खेळ’ दस्तुरखुद्द पालकमंत्र्यांच्या भेटीनंतरही थांबलेला नाही. गेल्या साडेतीन महिन्यांत तब्बल नऊ डॉक्टर ग्रामीण रुग्णालयात येऊन गेले. रुग्णालयातील निम्म्या रिक्त पदांमुळे यंत्रणा धूळ खात पडली आहे. पूर्णवेळ डॉक्टर नसल्याने रुग्णालय आणि निवासस्थानावर करोडोंचा खर्च होऊनही सध्या रुग्णांना ‘पै’चाही उपयोग होताना दिसत नाही. त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टरही कसरतीने दोन तीन जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. त्यामुळे वैभववाडी तालुक्यातील आरोग्य यंत्रणा अक्षरश: कोमात गेली आहे.तालुक्यासाठी ग्रामीण रुग्णालय मंजूर झाल्यानंतर तब्बल १५ वर्षांनी रुग्णालयाची इमारत सुसज्ज झाली. रुग्णालयात पूर्णवेळ डॉक्टरांचा पत्ता नसताना त्यांच्यासाठी प्रशस्त निवासस्थाने उभारली. रुग्णालयास मंजुरी मिळताच इमारत नसतानासुद्धा सात वर्षे एम. डी. डॉक्टर येथे कार्यरत होते. मात्र गेल्या नऊ वर्षांपासून हे पद कायमस्वरूपी रिक्त आहे. रुग्णालय इमारत आणि वैद्यकीय अधिकारी निवासस्थानांवर जवळपास सहा कोटी रुपये खर्च झाले. परंतु, रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना काहीवेळा तपासण्यासाठीही डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने इमारतीवरील करोडोंचा खर्च निरूपयोगी ठरत आहे. वैद्यकीय अधीक्षकांसह डॉक्टरांची पाच पदे ग्रामीण रुग्णालयात मंजूर असताना एप्रिलपर्यंत सुमारे वर्षभर डॉ. एन. टी. कांबळे यांनी एकहाती कारभार सांभाळत अहोरात्र रुग्णसेवा केली. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाच्या ‘ओपीडी’त सातत्याने वाढ होत गेली. मात्र, त्यांच्या नेमणुकीचा करार संपल्यानंतर रुग्णालयाची अक्षरश: वाताहात लागली. डॉ. कांबळेंच्या काळात १४० पर्यंत गेलेली ‘ओपीडी’ डॉक्टरांच्या खेळखंडोबामुळे साठच्या जवळपास घसरली आहे. याला सत्ताधारी आणि प्रशासकीय सावळा गोंधळ कारणीभूत ठरला आहे.डॉक्टरांची संगीत खुर्चीमार्चपर्यंत कार्यरत असलेले डॉ. कांबळे यांचा करार संपल्याने प्रशासनाने ग्रामीण रुग्णालयाच्या भवितव्याचा विचार न करता उंबर्डेत प्राथमिक आरोग्य केंद्रात एक पूर्णवेळ डॉक्टर कार्यरत असताना सहायक वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. कांबळे यांना उंबर्डेत नियुक्ती दिली. आरोग्य यंत्रणेच्या या चुकीमुळे ग्रामीण रुग्णालयात संगीत खुर्चीचा खेळ सुरू होऊन साडेतीन महिन्यांत नऊ डॉक्टरांनी हजेरी लावली. नऊपैकी पाच डॉक्टर हे राधानगरी कसबा बावडा, चंदगड, कोल्हापूर आणि सांगली येथून तीन ते १५ दिवसांसाठी येऊन गेले. प्रशासनाने डॉक्टरांचा खेळखंडोबा केल्याने दुपारी एकनंतर रुग्णालयात शुकशुकाट असतो. ओपीडी बंद झाल्यानंतर रुग्ण गेला, तरीही कर्मचारी हताशपणे पुढचा रस्ता धरण्याचा सल्ला देत आहेत.पालकमंत्र्यांचे आश्वासन पोकळजुलैच्या पहिल्या आठवड्यात वैभववाडीच्या दौऱ्यावर आलेले पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन समस्या जाणून घेतल्या. त्याचप्रमाणे आठ दिवसांत कायमस्वरूपी डॉक्टर नव्या भरतीतून देण्याचे आश्वासन देत आघाडीच्या काळात एक होते, तर आपण चार डॉक्टर देऊ असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.पालकमंत्र्यांनी आश्वासन देऊन तीन आठवडे उलटले तरी चार सोडाच एकही डॉक्टर कायमस्वरूपी देऊ शकले नाहीत. त्यामुळे पालकमंत्र्यांचे आश्वासन पोकळ होते, अशी चर्चा विरोधकांसह सामान्य नागरिकांमध्ये सुरू आहे.
तालुक्याची आरोग्य यंत्रणा कोमात
By admin | Updated: July 28, 2015 20:42 IST