रत्नागिरी : गेली अनेक दशके मराठा आरक्षणाचा निर्णय रखडला होता. तो आता मार्गी लागला आहे. या आरक्षण निर्णयानंतर आता शांत बसण्याची वेळ नाही. तेव्हा खेड्यांकडे चला. तेथे वाडी-वस्तीत हलाखीचे जीवन जगणाऱ्या मराठा समाजबांधवांच्या कुटुंबांना भेटा. त्यांना चांगले जगण्याबाबत, आरक्षणाच्या लाभांबाबत मार्गदर्शन करा. मराठा समाजाचे भले करा. आरक्षणाच्या निर्णयानंतरही असलेली उदासिनता, मरगळ झटका आणि कामाला लागा, असा प्रेमाचा सल्ला उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मराठा समाज बांधवांना दिला. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षणाचा हक्क मिळवून देण्यात सिंहाची भूमिका बजावणाऱ्या उद्योगमंत्री तथा कॉँग्रेसचे राज्याचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांचा जिल्ह्यातील मराठा समाजाच्यावतीने येथील सावरकर नाट्यगृहात कृतज्ञता ंमेळाव्यात सत्कार करण्यात आला. त्यावेळी राणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार नीलेश राणे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार, गणपत कदम, विजयसिंह महाडिक, मराठा समाजाचे नेते आबा सावंत, केशवराव भोसले, मराठा महासंघाचे डॉ. रमेश चव्हाण, दिलीप जगताप आदी उपस्थित होते. यावेळी उद्योगमंत्री राणे यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. राणे म्हणाले, राज्याचा मुख्यमंत्री न्यायासाठी काहीही करू शकतो. इच्छा हवी. मात्र, गेल्या ३० वर्षांत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही. हा प्रश्न सोडवणारच, असे मी सांगितले होते. त्यानुसार सोडविला आहे. सत्कारासाठी मी हे काम केलेले नाही. ज्यावेळी समिती नेमण्याचा विषय मंत्रिमंडळात आला त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच माझ्या नावाचा आग्रह धरला. या समितीद्वारे न्याय देण्याचा मी प्रयत्न केला. मराठा आरक्षण हा विषय आता इतिहास झाला आहे. आता या निर्णयावरून भविष्य घडवण्यासाठी कामाला लागा, असे राणे म्हणाले. सर्वच मराठा नेत्यांनी आरक्षण निर्णयाबाबत राणे यांची खुल्या मनाने प्रशंसा केली. जे काम अनेक मातब्बर मराठा नेत्यांना जमले नाही ते राणे यांनी केल्याने त्यांचे कौतुक करण्यात आले. अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजयसिंह महाडिक यांनी राणे हे महाराष्ट्राचे प्रतिशिवाजी असल्याचा उल्लेख केला. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराची मागणी केली. अनेक मराठा मुख्यमंत्रीही मराठा आरक्षण देऊ शकले नाहीत, ते काम राणेंनी केल्याचे शशिकांत पवार म्हणाले. (प्रतिनिधी)
मराठा आरक्षणाचा लाभ घ्या: नारायण राणे
By admin | Updated: August 14, 2014 22:40 IST