कणकवली : मालवण तालुक्यातील हडी कोथेवाडा येथील पोलीस पाटील जानू सिताराम कदम यांच्यावर अनोळखी व्यक्तीकडून झालेल्या दगडफेकीबाबत चौकशी करून संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघटना सिंधुदुर्गच्यावतीने जिल्हाधिकारी ई. रवींद्रन व जिल्हा पोलीस अधीक्षक संजीवकुमार बाविस्कर यांच्याकडे करण्यात आली आहे.ओरोस येथे पोलीस पाटील संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप सोनू सावंत, कणकवली तालुकाध्यक्ष अनंत राणे, कुडाळ तालुकाध्यक्ष देऊ सावंत, मोहन सावंत, उदय सावंत, नंदकिशोर राणे, अनंत मेस्त्री, भगवान कदम, स्वप्नील वेंगुर्लेकर, अशोक जाधव यांच्यासह अन्य पोलीस पाटील उपस्थित होते.या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना संघटनेकडून विविध मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच प्रांताधिकाऱ्यांशी संपर्क साधून जानू कदम यांच्यावर झालेल्या दगडफेकीबाबत अहवाल प्राप्त केला जाईल तसेच संबंधितांवर कारवाई केली जाईल असे सांगितले. पोलीस पाटलांच्या थकीत तीन महिन्यांच्या मानधनाबाबत निर्णय घेण्यात आला असून मानधनाच्या प्रस्तावावर सह्या केल्याचेही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितले.गावराई येथील पोलीस पाटील स्वप्नील वेंगुर्लेकर यांनी गावपातळीवर काम करत असताना गावातील लोकांकडून त्रास होत असल्याबाबत तोंडी तक्रार केली. जे पोलीस पाटील व्यवस्थितपणे काम करतात त्यांनाच ग्रामस्थांकडून त्रास दिला जातो. त्यामुळे ग्रामस्थांकडून पोलीस पाटलांबाबत प्रशासनाजवळ तक्रारी आल्यास योग्य ती चौकशी करूनच निर्णय घेण्यात येईल. पोलीस पाटील संघटनेने मेळावा घेऊन पोलीस पाटील व जनता यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी प्रयत्नरत रहावे, असेही जिल्हा पोलीस अधीक्षक संजीवकुमार बाविस्कर यांनी सांगितले.पोलीस पाटलांना निवडणूक भत्ता दिला जात नसल्याबाबत जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांचे लक्ष वेधण्यात आले. यापुढे पोलीस पाटलांना वेळेत मानधन देणे, निवडणूक भत्ता देणे याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे शिष्टमंडळाला त्यांनी सांगितले. तसेच पोलीस पाटलांना योग्य सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी केले. (वार्ताहर)
‘त्या’ दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करा
By admin | Updated: November 18, 2014 23:26 IST