वैभववाडी : शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेबांना वेदना देऊन सत्ता आणि पदांच्या लालसेने अनेकजण ९ वर्षांपूर्वी राणेसमर्थक बनून काँग्रेसवासी झाले. राज्यातील सत्तापालटानंतर जिल्ह्यातही सत्तेत येण्याची शाश्वती नसल्याने तेच लोक पुन्हा शिवसेनेत येण्यासाठी धडपडत आहेत. परंतु तालुक्यातील अशा स्वार्थी लोकांना शिवसेनेत प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती तालुकाप्रमुख अशोक रावराणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.रावराणे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, नारायण राणे यांनी शिवसेना सोडली त्यावेळी वैभववाडी तालुक्यातील बहुतेक मतलबी व स्वार्थी लोक समर्थक बनून काँग्रेसवासी झाले. त्यांनी बाळासाहेबांचे घरात लावलेले फोटोही काढून टाकले. इतकेच नव्हे तर त्यांच्यासोबत काँग्रेसवासी न झालेल्या कट्टर शिवसैनिकांना अपमानित करून धमकावून सत्तेचा माजही दाखवून दिला होता. मात्र निष्ठावंत शिवसैनिक भगव्याशी प्रामाणिक राहिला. पडत्या काळात सेना जीवंत ठेवण्याचे काम याच शिवसैनिकांनी केले.ते म्हणाले, आमदार वैभव नाईक यांच्या शिवसेना प्रवेशानंतर संपूर्ण जिल्ह्यातील संघटनेला नवसंजीवनी मिळाली. त्यांनी जिल्ह्यात पक्ष संघटना भक्कम करताना वैभववाडी तालुक्याला संपूर्ण पाठबळ दिले. त्यामुळे येथील शिवसैनिकांचे मनोबल उंचावले. गेल्या ९ वर्षात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीशी तोंड देताना शिवसैनिकांनी प्रचंड संघर्ष केला. जनतेच्या प्रश्नांसाठी अनेकदा मोर्चे, आंदोलने करून काँग्रेस सरकारला वठणीवर आणण्याचे काम शिवसैनिकांनी केले. त्यावेळी हीच स्वार्थी समर्थक काँग्रेसी मंडळी शिवसैनिकांची टिंगल करीत होती. परंतु तेच लोक आता राज्य व केंद्रातील सत्तेचा लाभ उठविण्यासाठी पुन्हा सेनेत येण्यासाठी धडपडत आहेत.नऊ वर्षांपूर्वी राणेंबरोबर काँगे्रसवासी झालेले हेच लोक प्रवाहाच्या विरोधी जाल तर मराल असे शिवसैनिकांना ठणकावून सांगत होते. त्यांनी राणेंच्या जीवावर सभापती, उपसभापती व इतर अनेक पदे उपभोगली. मात्र, तेच लोक जिल्ह्यात काँग्रेसची धुळधाण उडत असल्याने पुन्हा सत्तेत येण्याची शाश्वती नसल्यामुळे राणेंना सोडून शिवसेनेत येऊन सत्तेची फळे चाखण्यासाठी धडपडत आहेत. त्यांचे ९ वर्षांपूर्वीचे राणेप्रेम आता गेले कुठे? असा प्रश्न करीत समर्थकांचा शिवसेना प्रवेशाचा स्वार्थी डाव शिवसैनिक हाणून पाडतील, असे अशोक रावराणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)समर्थकांच्या हालचालींना दुजोरामाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासमवेत २००५ मध्ये काँग्रेसवासी झालेल्यांपैकी माजी तालुकाप्रमुख, माजी सभापती, विभाग प्रमुख, सरपंच असे काहीजणांच्या सेना प्रवेशाच्या हालचाली गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. मात्र त्याची उघडपणे वाच्यता झाली नव्हती. शिवसेना तालुकाप्रमुख अशोक रावराणे यांच्या प्रसिद्धीपत्रकामुळे समर्थकांच्या हालचालींना दुजोराच मिळाला आहे. त्यामुळे आगामी काळात नेमकी कोणती राजकीय स्थित्यंतरे घडतात, याची सर्वांना उत्सुकता आहे.
स्वार्थी समर्थकांना सेनेत प्रवेश नाहीअशोक रावराणे : वैभववाडीतील राजकारण
By admin | Updated: December 26, 2014 00:20 IST