मालवण : केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर प्रथमच दोन दिवसांच्या सिंधुुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून १० जानेवारी रोजी मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात सकाळी ११ वाजता त्यांचा भाजपच्यावतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा मालवण तालुकाध्यक्ष विष्णू मोंडकर आणि जिल्ह्याचे भाजपा पदाधिकारी विलास हडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.मालवण येथे भाजपा तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मोंडकर बोलत होते. यावेळी भाऊ सामंत, विजय केनवडेकर, काका मेस्त्री व इतर उपस्थित होते.यावेळी बोलताना मोंडकर म्हणाले की, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची महत्त्वाच्या अशा रेल्वे मंत्रालयाच्या मंत्रीपदी निवड करण्यात आल्याने मालवणच्या विकासाचा तो सुदीन ठरला आहे. प्रभू यांच्या नियुक्तीमुळे मालवण तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. प्रभू यांचा आगामी दौरा पर्यटन, व्यापार, कृषी, मासेमारी, शेतकरी अशांसाठी आशादायी व निर्णायक ठरेल. सीआरझेडचा प्रश्न, व्यापारी, शेतकरी, पर्यटन व्यावसायिकांचे प्रश्न या निमित्ताने सोडविण्याचा भाजपच्यावतीने प्रामाणिक प्रयत्न केला जाईल असे मोंडकर म्हणाले.या नागरी सत्कारानिमित्ताने कोकण रेल्वेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांना वेगळा डबा आणि इतर सुविधा उपलब्ध होण्याची मागणी करण्यात येणार आहे. तसेच सिंधुदुर्गात पार्सल सेवेसाठी कार्यालय उघडण्याची विनंती करण्यात येणार आहे अशी माहिती हडकर यांनी दिली. १० व ११ जानेवारीला मंत्री प्रभू हे सिंधुदुर्गात येत असून १० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मालवण भरडनाका येथे भाजपच्यावतीने भव्य स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्यावर जावून प्रभू छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहेत. १० जानेवारी रोजी दुपारनंतर कुडाळ तालुक्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत ११ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता श्री देव रामेश्वराचे दर्शन घेणार आहेत. नंतर ते देवगड तालुक्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मालवणच्या नागरी सत्कार सोहळ्यात इतरही राजकीय पक्षांच्या व्यक्तींना सहभागी करून घेण्यात येणार आहे.कोकण रेल्वे संबंधी सुरेश प्रभू यांच्याकडे प्रश्न मांडावयाचे असल्यास किंवा त्यांचा सत्कार करायचा असल्यास जनतेने आणि सामाजिक संस्थांनी मालवण तालुका भाजपा कार्यालय हॉटेल महाराजाच्या पाठिमागे किंवा विजय केनवडेकर, विजय फुटवेअर यांच्याकडे ९ जानेवारीपर्यंत नावे द्यावीत. अचानकपणे सत्काराची नावे स्वीकारली जाणार नाहीत असेही मोंडकर म्हणाले. (प्रतिनिधी)
सुरेश प्रभू दोन दिवस जिल्ह्यात
By admin | Updated: January 5, 2015 00:39 IST