चिपळूण : शहरातील इब्राहिम कॉम्प्लेक्स येथे असणारी महा - ई सेवा केंद्रातील आधार यंत्रणा आज (रविवारी) अचानक बंद पडल्याने आधारकार्ड काढण्यासाठी आलेल्या ग्रामीण जनतेला माघारी फिरावे लागले. पहाटेपासून आलेल्या ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. ही यंत्रणा दुरुस्तीसाठी मुंबईला घेऊन जावे लागणार असून, किती दिवसात दुरुस्त होईल हे सांगता येणार नाही, असे केंद्र संचालक यांनी सांगितले. या महा - ई सेवा केंद्रातून रविवारसाठी १०२ अर्ज वितरित झाले असून, केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेऊन लवकर आपला नंबर लागेल, या आशेने ग्रामीण भागातील ग्रामस्थ व मुले यांनी सकाळपासूनच आधार केंद्रावर गर्दी केली होती. सकाळी १०.३० वाजेपर्यंत महा - ई सेवा केंद्र उघडले नव्हते. मात्र, शटरवर आधारकार्ड यंत्रणा बंद असल्याचा फलक लावण्यात आला होता. आधारकार्ड काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. कोणाशी संपर्क साधावा, याचा विचार येथे आधार कार्ड काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांना पडला होता. दरम्यान, महा - ई सेवा केंद्राचे संचालक येथे हजर झाले. त्यांनी आलेल्या ग्राहकांना यंत्रणा बंद पडली आहे ती केव्हा सुरु होईल हे सांगता येत नाही, असे सांगितले. मात्र, दुरुस्तीसाठी मशीन मुंबई येथे घेऊन जावे लागेल. किती दिवसात ती दुरुस्त होईल, हे सांगता येत नाही. मात्र, ज्या ग्राहकांना अर्जाचे वितरण झाले आहे. त्यांना प्रथम क्रमांकाने संधी दिली जाईल, असे केंद्र संचालक यांनी सांगितल्यानंतर या महा - ई सेवा केंद्रासमोर झालेली गर्दी हळूहळू कमी झाली. या सर्व प्रकारामुळे परिसरात आधारकार्ड काढायला येणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. चिपळूण शहरातील हे केंद्र बंद असल्याने आधारकार्डसाठी येणाऱ्यांचे हाल झाले आहेत. आधार कार्ड काढण्यासाठी झालेल्या गर्दीला कार्यालयावरचा फलक पाहून माघारी फिरावे लागल्याने आता हे केंद्र कधी सुरू होणार याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)यंत्रणा दुरूस्ती मुंबईत होणार..सध्या आधारची गरज प्रत्येक ठिकाणी लागत असल्याने या केंद्रावर प्रचंड गर्दी होते. चिपळूण शहरातील या केंद्रावर मोठी गर्दी झाली. रविवार असल्याने सुटीत हे काम करण्यासाठी ग्राहक सकाळीच या ठिकाणी आले आणि त्यांना केंद्राच्या कार्यालयावर यंत्रणा बिघडल्याने आधारचे काम होणार नाही, असा मजकूर लिहिलेला पाहायला मिळाला. मात्र, ही यंत्रणा बंद पडल्याने अनेकांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे.
आधार यंत्रणा कोलमडली
By admin | Updated: July 6, 2015 00:25 IST