सावंतवाडी : मित्राच्या त्रासाला कंटाळून मळगाव-आजगावकरवाडी येथील प्रणय श्रीधर आजगावकर (वय २१) या युवकाने आज, मंगळवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या मित्राला भ्रमणध्वनीवरून पाठविलेल्या एसएमएसमध्ये संबंधित युवकाचे नाव लिहून, ‘मला त्रास दिला. त्याला सोडू नका’ असे म्हटले आहे. पोलिसांनी भ्रमणध्वनीवरचा एसएमएस ताब्यात घेतला असून, युवकाचे नाव गुप्त ठेवले आहे. मळगाव-आजगावकरवाडी येथे राहणाऱ्या प्रणय आजगावकरचे शिक्षण दहावीपर्यंत झाले होते. दहावी झाल्यानंतर तो छोटे-मोठे काम करीत होता. आज सकाळी आई आणि भाऊ शेतात भात कापणीसाठी गेले होते. घरात कोणी नसल्याचे पाहून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने घरी आलेल्या त्याच्या भावाने घराला आतून कडी असल्याचे पाहून आपल्या काकांना बोलावून घेतले. त्यांनी खिडकीतून आत पाहिले असता प्रणय गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. त्यांनी इतर नातेवाइकांना बोलावून घेतले व पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा / पंचनामा करून मृतदेह निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदनांतर दुपारी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रणयच्या पश्चात आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप वेडे करीत आहेत. (प्रतिनिधी)आत्महत्येपूर्वी चुलत भावास केला एसएमएसप्रणय याने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या चुलत भावाला भ्रमणध्वनीवर एसएमएस केल्याचे पुढे आले आहे. या एसएमएसमध्ये ‘मला सावंतवाडीतील एका युवकाने त्रास दिला आहे. त्याला सोडू नका’ असे म्हटले आहे. हा एसएमएस त्याच्या मित्राने शेतातून परतल्यानंतर सायंकाळच्या सुमारास पाहिला, परंतु त्यापूर्वीच प्रणयने स्वत:चे जीवन संपविले होते. एसएमएस साधारणत: ८ वाजून ५४ मिनिटांनी केला होता, तर प्रणयने सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली.
मित्राच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या
By admin | Updated: November 11, 2014 23:20 IST