कणकवली : फोंडाघाट, भालेकरवाडी येथे गुरुवारी सायंकाळी एस.टी.बस व ट्रक यांच्यात अपघात झाला होता. या अपघातानंतर तिघांनी आपले अपहरण करुन मारहाण केली, अशी तक्रार एस.टी.चालक राजाराम कृष्णा तोरसकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार तोंडवली येथील विलास रामचंद्र बोभाटे यांच्यासह तिघांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करून अटक केली होती. दरम्यान, त्या तिघांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता ६ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. देवगड-निपाणी मार्गावरून राजाराम कृष्णा तोरसकर (वय २४, रा. उतळा, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) हे पुणे-वेंगुर्ले एस.टी. (एमएच २0 बीएल ३२४१) घेऊन गुरुवारी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास येत होते. फोंडाघाट-भालेकरवाडीच्या दरम्यान ते आले असता कोल्हापूरच्या दिशेने जाणारा ट्रक (एमएच 0७, १९४१) व बस यांच्यामध्ये अपघात झाला. हा ट्रक विलास बोभाटे चालवित होते. अपघातात दोन्ही गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले. एस.टी.चालकाची चूक आहे, असे सांगून ट्रकचालक त्यांच्याकडे नुकसानभरपाई मागत होता. त्यामुळे वाद निर्माण झाला. त्यामुळे देवगड-निपाणी मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. दरम्यानच्या कालावधीत विलास रामचंद्र बोभाटे (वय ३७), विशाल मनोहर बोभाटे (२८) व राजाराम सहदेव बोभाटे (२६, सर्व रा. तोंडवली, बोभाटेवाडी) यांनी आपल्याला ओमनी गाडीत (एमएच 0७ क्यू ८९५८) घालून पळवून नेले. तसेच शासकीय कर्तव्य करण्यास अटकाव करून मारहाण केली. तसेच गाडीची नुकसानभरपाई म्हणून एक लाख रुपये खंडणी मागितली. तसेच न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार एस.टी.चालक राजाराम तोरसकर यांनी पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. त्यामुळे पोलिसांनी विलास बोभाटे यांच्यासह तिघांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, त्यांना गुरुवारी रात्री १२.३0 वाजण्याच्या सुमारास अटक केली. रेल्वे प्रवाशांचा स्टेशन मास्तरना घेराव कुडाळ : गणेशोत्सव हॉलीडे स्पेशल रेल्वे तब्बल आठ तास लेट असल्यामुळे कुडाळ रेल्वे स्थानकात अडकलेल्या व संतप्त प्रवाशांनी गुरूवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास कुडाळ रेल्वे स्टेशन मास्तरांना घेराव घालून याबाबत जाब विचारला. शेवटी ही रेल्वे १.३0 वाजता आली. तब्बल आठ तास ही रेल्वे उशिराने कुडाळ रेल्वे स्थानकात आली. मुंबईला जाण्यासाठी ही रेल्वे गोवा येथून कुडाळ येथे ५ वाजता येते. ही रेल्वे उशिराने धावत असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले. मात्र, ही रेल्वे १ वाजला तरी आली नसल्याने संतप्त प्रवाशांनी कुडाळ रेल्वे स्टेशन मास्तरांना घेराव घालून याबाबत जाब विचारला.
अपघातानंतर एसटीचालकाला मारहाण; तिघांना अटक
By admin | Updated: October 2, 2015 23:19 IST