खटाव : ‘जिहे-कठापूर’चे पाणी खटाव तालुक्यातील जनतेपर्यंत अद्याप पोहोचले नाही. गेल्या कित्येक पंचवार्षिक निवडणुका या पाणी प्रश्नावर लढविल्या गेल्या; परंतु आतापर्यंत काहीच नाही. त्याची स्थिती ‘ये रे माझ्या मागल्या’ अशीच असून, या गोष्टीचा जाहीर निषेध करण्यासाठी खटावमधील ग्रामस्थांनी रविवारी येथील शहाजीराजे महाविलयाजवळ रस्ता रोको आंदोलन केले. पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी १४ जून रोजी जिहे-क ठापूरचे पाणी नेर तलावात आणणार, अशी घोषणा केली होती, ती केवळ हवेतच गेली असल्यामुळे आतापर्यंत केवळ दिशाभूल करून निवडणुकीत मतांचा जोगवा मागणाऱ्या नेते मंडळींनी केवळ निवडणूक जवळ आली की खटाव माणच्या दुष्काळी जनतेच्या पाणी प्रश्नावर मोठी आश्वासने देऊन आतापर्यंत ही निवडणूक लढवून येथील जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले आहे. आतापर्यंत कोणतेच ठोस असे काम उभे न केल्यामुळे कायम दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या येथील जनतेने आता भूलथापांना बळी न पडता पाणीप्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करण्याचा निर्धार केला असून, त्याची सुरुवात आता पासूनच या रस्ता रोकोच्या माध्यमातून करण्यात आली आहे. जो पर्यंत आमच्या तालुक्याला हक्काचे पाणी मिळणार नाही, तोपर्यंत विविध मार्गांतून शांततेने आम्ही शेतकरीबांधव आंदोलन करणार असल्याचे यावेळी माजी पंचायत समिती सदस्य मधुकर पाटोळे यांनी सांगितले. इथून पुढे ‘आधी काम मगच मतदान,’ अशी भूमिका सर्वसामान्य जनतेची असेल, असाही इशारा याप्रसंगी राजेंद्र करळे यांनी दिला. खटावचे तहसीलदार विवेक साळुंखे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी तलाठी एच. जी. उराडे उपस्थित होते. पुसेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनात शेतकरी तसेच ग्रामस्थांचे वतीने मनोज देशमुख, दीपक विधाते, अशोक कुदळे, सनी पाटोळे, जगन्नाथ जगदाळे, मधुकर पाटोळे, डॉ. विजय भराडे, मोहन घाडगे आदींनी निवेदन दिले.यावेळी किसन मोरे,बंडा बागल, अण्णा शिंदे, रमेश शिंदे, लक्ष्मण कोकाटे ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित हाते. (वार्ताहर)
‘जिहे-कठापूर’च्या पाण्यासाठी खटाव ग्रामस्थांचा रास्ता रोको
By admin | Updated: July 21, 2014 23:20 IST