श्रीकांत चाळके-खेड --खेड तालुक्यातील कोतवली-सोनगाव येथील जंगलमय भागात गतवर्षी मृत झालेला बिबट्या आढळून आला. त्याची १८ नखे गायब झाली होती. ८ दिवसांनंतर त्यापैकी १५ नखे त्याच जंगलात आढळून आली होती. त्यामुळे येथील जंगलात या नखांची तस्करी होत असल्याचे समोर आले़ मात्र, ३ नखांचा पत्ता लागला नाही़ तीन महिने उलटून गेल्यानंतरही या तस्करीप्रकरणी तपास करण्यात वनविभागाला अपयश आले. त्यामुळे वनअधिकारी सुतार यांनी आपला अहवाल गुरूवारी वन विभागाला सादर केला असून, तसे खेड पोलिसांनाही पत्र दिल्याची माहिती सुतार यांनी दिली.खेड तालुक्यातील कोतवली -सोनगाव ही जंगलमय भागाशेजारी असलेली गावे. मात्र, येथील जंगलात बिबट्याची शिकार झालेली तशी ऐकीवात नाही़ शिवाय येथील जंगलात बिबट्याच्या अस्तित्त्वाबाबत विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत़ तरीही गतवर्षी आॅक्टोबर महिन्यात बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्याची सर्व १८ नखे कापून घेण्यात आली होती. यावरून बिबट्याच्या नखांची तस्करी करणाऱ्या टोळीचा यामध्ये हात असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी येथील वन अधिकारी वारंवार या जंगलात फिरत होते. मात्र, आठ दिवसांनंतर त्याच ठिकाणी वनअधिकाऱ्यांना १५ नखे आढळून आली होती, तर ३ नखांचा तपास करता करता वनअधिकाऱ्यांच्या नाकीनऊ आले. तीन महिन्यांच्या आत हा तपास करणे आवश्यक होते. मात्र, यामध्ये वन अधिकाऱ्यांना अपयश आल्याने तसा अहवाल त्यांनी गुरूवारी वरिष्ठांना सादर केला. खेड पोलिसांकडे पुढील तपासाच्या चाव्या सुपूर्द केल्याचे सांगण्यात आले आहे़ खेड तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वडगाव, कळंबणी, विहाळी, चकदेव आणि कांदोशी येथील जंगलात अद्याप बिबट्याचा संचार असल्याच्या शक्यतेला वन अधिकाऱ्यांकडून पुष्टी मिळाली आहे. मात्र, तेथील जंगलात वाघाची शिकार झालेली आठवत नाही़ यामुळे कोतवली - सोनगाव येथील घनदाट जंगलात मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याविषयी खुद्द वन अधिकाऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. चार वर्षांपूर्वी खेड बसस्थानकावर बिबट्याचे चामडे बाळगलेल्या दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडले होते. याप्रकरणी संबंधितांची चौकशी केली असता कोल्हापूर येथून हे चामडे आणल्याची माहिती त्यांनी दिली होती. यामुळे वन अधिकारी गोंधळून गेले आहेत. आता या प्रकरणाच्या मुळापर्यंत तपास करणे आवश्यक आहे. शासकीय नियमानुसार तीन महिन्यामध्ये (९० दिवसांमध्ये) अशा घटनांचा तपास न लागल्यास हा तपास बंद करावा लागतो. यापुढील तपास आता खेड पोलिसांनी करावा, अशी विनंती वन अधिकाऱ्यांनी पत्राद्वारे केल्याचे सुतार यांनी सांगितले़
बिबट्याच्या तस्करीप्रकरणी तपास थांबवला
By admin | Updated: November 14, 2014 23:07 IST