टेंभ्ये : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून राज्यामध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ‘लेक शिकवा’ अभियान सुरु करण्यात आले आहे. शैक्षणिक परिवर्तनाचे एक महत्वपूर्ण अभियान म्हणून या अभियानाकडे पाहिले जात आहे. मुलींच्या शिक्षणासाठी प्रबोधनाचे एक महत्त्वाचे पर्व यानिमित्ताने कार्यान्वित करण्यात येणार आहे.शनिवार, दि. ३ जानेवारीपासून या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. २६ जानेवारीपर्यंत प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून हे अभियान राबविले जाणार आहे. ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्ताने या अभियानाची सुरुवात करण्यात आली. उर्वरित उपक्रमांमध्ये प्रामुख्याने खालील उपक्रमांचा समावेश आहे. मंगळवार, दि. ६ रोजी शाळेतील कर्तृत्ववान माजी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात येणार आहे. बुधवार, दि. ७ रोजी शाळाबाह्य मुलींच्या घरी भेट देऊन त्यांना शाळेत येण्यास प्रवृत्त करण्यात येईल. गुरुवार, दि. ८ रोजी मुलींकडून किमान पदवीपर्यंत शिक्षण न सोडण्याची प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. शुक्रवार, दि. ९ रोजी महिला कार्यकर्त्यांचा शाळेत सत्कार करण्यात येणार आहे. शनिवार, दि. १० रोजी भटक्या जाती - जमातींच्या मुलींचे सर्वेक्षण होईल. सोमवार, दि. १२ रोजी मुलींची घोषवाक्य स्पर्धा होणार आहे. मंगळवार, दि. १३ रोजी मुलींच्या वक्तृत्व स्पर्धा होतील. बुधवार, दि. १४ रोजी शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, पदाधिकारी शाळेत जाऊन अध्यापन करणार आहेत. दि. १५ रोजी चित्रकला स्पर्धा, दि. १६ रोजी बुद्धिबळ स्पर्धा, शनिवार, दि. १७ रोजी आदर्श मातांचा सत्कार करण्यात येणार आहे. दि. १९ला चावडी वाचन, दि. २०ला ज्युडो कराटे प्रात्यक्षिक, दि. २१ला मुलींच्या मैदानी स्पर्धा, गुरुवार, दि. २२ला मुलींची आरोग्य तपासणी, दि. २३ला माता शिक्षक - पालक संवाद सभा होईल. दि. २४ रोजी कथाकथनाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. सोमवार, दि. २६ रोजी गुणी विद्यार्थिनींच्या सत्काराने अभियानाची सांगता होणार आहे. (वार्ताहर)गतवर्षी या अभियानाच्या माध्यमातून तब्बल ६५,००० मुली शाळेत कायमस्वरुपी टिकून राहिल्या आहेत. यावर्षीच्या अभियानातून प्रत्येक मुलीला किमान पदवीपर्यंत शिक्षण देण्याबाबत पालकवर्गाला आवाहन करण्यात येणार आहे.
राज्यात ‘लेक शिकवा’ अभियानाला प्रारंभ
By admin | Updated: January 6, 2015 00:44 IST