कणकवली : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमुळे अनेक व्यवसाय तेजीत आले असतानाच एस. टी. महामंडळालाही ६० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कासार्डे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी भाजपकडून २०० एस. टी. गाड्या प्रासंगिक करारावर भाड्याने घेण्यात आल्या होत्या. प्रत्येक गाडीसाठी १५ हजार रुपये या दराने ३० लाख रुपये भाजपकडून एस. टी. महामंडळाकडे जमा करण्यात आले होते. पंतप्रधानांच्या सभेसाठी गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. कोल्हापूर जिल्ह्यातूनही २५ एस. टी. गाड्या आणण्यात आल्या होत्या.विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात १४ व १५ आॅक्टोबर रोजी एस. टी. च्या तब्बल १०४ गाड्या आरक्षित करण्यात आल्या होत्या. या गाड्यांच्या २०८ फेऱ्या विविध ठिकाणी झाल्या होत्या. यामधूनही एस. टी. महामंडळाला सुमारे ३० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. निवडणुकीत कर्मचारी व साहित्य मतदान केंद्रावर पोहोचविण्यासाठी तसेच परत मतमोजणीच्या ठिकाणी आणण्यासाठी एस. टी. गाड्यांचा वापर करण्यात आला. कणकवली विधानसभा मतदारसंघात ३७, कुडाळ विधानसभा मतदारसंघात ३४ तर सावंतवाडी मतदारसंघासाठी ३३ एस. टी. गाड्यांचे आरक्षण करण्यात आले होते. यामुळे एस. टी. च्या सिंधुदुर्ग विभागाला सुमारे ६० लाखांचे उत्पन्न मिळाले असल्याची माहिती एस. टी. च्या सूत्रांनी दिली.एस. टी. महामंडळासाठी सप्टेंबर, आॅक्टोबर महिना तसा स्लॅक सीझनच असतो. गणपतीनंतरच्या काळात एस.टी. महामंडळाला निवडणुकीमुळे चांगला लाभ झाला आहे. (वार्ताहर)
एस.टी. महामंडळाला ६0 लाखांचे उत्पन्न
By admin | Updated: October 23, 2014 22:53 IST