कणकवली : राज्यातील विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात १५ आॅक्टोबर रोजी जाहीर झाली आहे. सिंधुदुर्गात यापूर्वीच काहींनी प्रचार सुरू केला आहे. आचारसंहिता जाहीर झाल्याने आता इच्छुकांची धावपळ वाढणार आहे. तसेच राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.जिल्ह्यातील तीन मतदारसंघातील संभाव्य लढतींचे चित्र रंगवण्यात येत आहे. सिंधुदुर्गातील अलीकडच्या काळातील राजकीय घडामोडींनी निवडणुकीची रंगत वाढली आहे. पालकमंत्री नारायण राणे यांच्या साथीदारांनी सोडलेली साथ, आमदार दीपक केसरकर यांचा राष्ट्रवादी कॉँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेना प्रवेश तसेच कुडाळ-मालवण मतदारसंघातील उमेदवार निश्चिती अजूनही झालेली नाही. उद्योगमंत्री नारायण राणे निवडणूक लढविणार की नाही, याबाबतचा निर्णयही झालेला नाही. त्यामुळे सर्वच बाबतीत परिस्थिती संदिग्ध आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार प्रमोद जठार यांच्या विरोधात काँग्रेसकडून नीतेश राणे यांना कॉँग्रेसने उमेदवारी देऊ केली आहे. या मतदारसंघावर कॉँग्रेसच्याच आमदार विजय सावंत यांनी दावा केला असल्याने ते बंडखोरी करण्याच्या पवित्र्यात आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता कुडाळ मतदारसंघातही चुरशीची शक्यता आहे. याठिकाणी शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख वैभव नाईक इच्छुक आहेत. तर सावंतवाडी मतदारसंघातून आमदार दीपक केसरकर यांना शिवसेनेकडून उमेदवारीची शक्यता आहे. मनसेकडून परशुराम उपरकर यांनी प्रचारास सुरुवात केली आहे. नारायण राणेंपासून फारकत घेतलेले माजी आमदार राजन तेली हेसुद्धा या मतदारसंघातून इच्छुक दिसतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय हालचाली गतिमान
By admin | Updated: September 12, 2014 23:51 IST