कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांची दयनीय स्थिती झाली असून, गरीब रुग्णांना योग्य उपचार मिळत नाहीत. अनेक रुग्णांना गोवा किंवा कोल्हापूर येथे उपचारासाठी हलवावे लागते. त्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. ही स्थिती तातडीने न सुधारल्यास मनसेला तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी दिला आहे.याबाबत प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया, लेप्टो तसेच तापसरीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात शासकीय रुग्णालयात तसेच प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल होत आहेत. मात्र, आरोग्य यंत्रणा कोलमडली असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. वेंगुर्ले, कणकवली, सावंतवाडी, देवगड, ओरोस येथील रुग्णालयातील काही रुग्ण दगावले आहेत. मात्र शासनाने त्याची दखल घेतलेली नाही. तसेच नवनिर्वाचित आमदारही या समस्येकडे लक्ष देताना दिसत नाहीत. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांकडून प्रत्येक रुग्णालयात जाऊन माहिती घेण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत सुधारणा होण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. त्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून मनसेच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असेही या पत्रकात म्हटले आहे. (वार्ताहर)
...तर आंदोलन करू : दाभोलकर
By admin | Updated: November 7, 2014 23:35 IST