कुवे : लांजा तालुक्यातील ग्रामीण भागात सप्टेंबर महिन्यात व आॅक्टोबर हीटमध्ये भातकापणीच्या हंगामात एकूण २२ जणांना सर्पदंश, तर २६ जणांना विंचूदंश झाला. यातील एकही रुग्ण दगावला नसल्याची माहिती लांजा ग्रामीण रुग्णालयातून उपलब्ध झाली आहे.ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसात पायवाटांना वाढलेले गवत शिवाय वातावरणात वाढलेला उष्मा अधिक असल्याने विंचूदंशाचे प्रमाण वाढते. कौलारु घरांचा विंचू आधार घेतात, तर उष्ण हवामान असल्याने सरपटणारे प्राणी बाहेर पडतात. कोकणात ग्रामीण भागात शेतकऱ्यांना कापणीच्यावेळी विंचूदंश व सर्पदंश घडण्याच्या घटना घडत आहेत. शेतीपूर्व मशागतीच्या कामापासून कापणीच्या हंगामापर्यंत शेतकऱ्यांना शेतात सरपटणारे प्राणी चावण्याच्या घटना वाढल्या आहेत. यामध्ये सप्टेंबर महिन्यात पाच पुरुषांना, तर एका महिलेला सर्पदंश झाला आहे. आॅक्टोबरमध्ये नऊ पुरुषांना सर्पदंश, तर पाच महिलांना सर्पदंश झाला असून, यामध्ये बारा वर्षांच्या आतील एक मुलगा व एक मुलगी यांना सर्पदंश झाला आहे.त्याचप्रमाणे सप्टेंबर महिन्यात चार पुरुषांना, तर ६ महिलांना विंचूदंश झाल्याची नोंद आहे. तसेच आॅक्टोबर महिन्यात ६ पुरुष, तर ७ महिलांना विंचूदंश झाला असून, बारा वर्षांच्या आतील ३ मुलांना विंचूदंश झाला असल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्पदंश व विंचूदंशावरील लस लांजा ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध असल्याने अशा रुग्णांवर तत्काळ औषधोपचार करणे शक्य झाले, असे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे संर्पदंश वा विंचूदंश झालेले रुग्ण दगावण्याचे प्रमाण कमी आहे. (वार्ताहर)
लांजा तालुक्यात २२ जणांना सर्पदंश
By admin | Updated: October 31, 2014 23:36 IST