कणकवली : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या वांद्रे पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांना विजय मिळाला. प्रतिष्ठेची लढत असलेल्या कॉँग्रेसच्या नारायण राणे यांचा दणदणीत पराभव झाला. यामुळे सिंधुदुर्गात शिवसैनिकांनी ठिकठिकाणी जल्लोष केला. कॉँग्रेसच्या गोटात मात्र सन्नाटा पसरला होता. शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्या निधनानंतर वांद्रेतील जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत कुडाळमध्ये पराभूत झालेले नारायण राणे यांनी पुन्हा आपली ताकद अजमावून पाहण्यासाठी उडी घेतली होती. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ही लढत असल्याने या लढतीच्या निकालाची सर्वांना मोठी उत्सुकता होती. निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना आणि राणेसमर्थक दोन्ही बाजूंकडील कार्यकर्ते मुंबईत पोहोचले होते. बुधवारी पहिल्या फेरीपासून शिवसेनेच्या तृप्ती सावंत आघाडीवर राहिल्याने शिवसैनिकांत उत्साह संचारला होता. प्रत्येक फेरीनंतर सावंत आणि राणे यांच्यातील मतांचा फरक वाढत गेल्याने शिवसैनिकांनी काही फेऱ्यानंतर फटाके फोडण्यास सुरूवात केली. मुख्य चौकात आतषबाजी करून भगवे झेंडे लावून दुचाकींची रॅली काढण्यात आली. शिवसेना शाखेकडे घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, युवा सेना जिल्हाप्रमुख अॅड. हर्षद गावडे, नगरसेवक सुशांत नाईक, युवा सेना तालुकाप्रमुख राजू राठोड, अनिल हळदिवे, रूपेश आमडोसकर, व्ही. डब्ल्यू. सावंत, अजित काणेकर, राजन म्हाडगुत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वांद्रेतील निकालाने शिवसेनेचा जल्लोष
By admin | Updated: April 15, 2015 23:55 IST