वारस तपास प्रक्रिया वारस तपासासाठी तलाठ्याकडे योग्य ती कागदपत्र सादर केल्यास या नोंदी होऊ शकतील, तर ३२ (ग)नुसार जमिनीची विक्री झाल्यावर सातबाराच्या इतर हक्कात जमीन मालकाचा बोजा असतो. ती रक्कम कुळांनी भरुनही बोजा शिल्लक आहे. ते शोधून रक्कम भरल्याची खात्री करुन चिपळूण व गुहागरातील ८६०७ सातबारा उताऱ्यांवरील बोजा कमी करण्यात येणार आहे. आता निसप्र जमिनीबाबतही काळजी करण्याचे कारण नाही. या साऱ्यामुळे आता ही प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.जबाबदारीचे भान...शासनाच्या विविध कार्यक्रमांतर्गत जनतेच्या प्रश्नावर अधिक गतीने पोहोचून त्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू असतात. चावडी वाचन कार्यक्रमातून गावोगावी असा प्रयत्न झाला. गावकऱ्यांना शासनाच्या योजना, त्यांचा लाभ, महसुली नियम कोणते, जमिनीबाबतचे अधिकार, प्रशासनाची जबाबदारी या सर्व गोष्टींवर भर देण्यात आली. आता सातबारा व अन्य दाखल्यांच्या बाबत शासकीय यंत्रणेने कारभार लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न चालविला आहे. या त्यांच्या प्रयत्नाना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून साथ मिळते आहे. ही बाब निश्चितच सकारात्मक आहे. शासनाने सातबारा कोरा करण्याचे धोरण अवलंबिले आणि त्याची सुरुवात टप्प्याटप्प्याने झाली. राज्यात ६ तालुक्यांमध्ये सातबाराचे संगणकीकरण झाले. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर व लांजा तालुके होते. आता चिपळूण, गुहागर व खेड तालुकेही आॅनलाईन होत आहेत. त्यामुळे आॅनलाईन प्रक्रियेत जिल्ह्यातील ५ तालुक्यांचा समावेश होणार आहे. चिपळूण विभागातील चिपळूण व गुहागर या दोन तालुक्यांचे सातबारा संगणकीकरणाचे काम आॅक्टोबरपासून खऱ्या अर्थाने सुरु झाले. २० कर्मचारी दिवसरात्र १२ संगणकावर काम करत आहेत. आता हे काम अंतिम टप्प्यात आले असून, सातबारावरील बोजाही कमी करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. जानेवारी २०१५ पासून एका क्लिकवर घरबसल्या सातबारा पाहायला मिळेल, असे उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे यांनी सांगितले. सातबारा संगणकीकरणाची मोहीम कुठपर्यंत आली? - चिपळूण व गुहागर या दोन तालुक्यांचा चिपळूण विभाग आहे. चिपळूण तालुक्यात २ लाख ६९ हजार ६६५, तर गुहागर तालुक्यात १ लाख ५७ हजार ६४७ सातबारा उतारे आहेत. हे सर्व सातबारा आॅनलाईन फिडिंग करुन त्यातील चुका दुरुस्त करुन ते वेबसाईटवर अपलोड केले आहेत. आॅक्टोबरपासून सर्व तलाठी १२ संगणकावर काम करत आहेत. त्यामुळे त्या सर्वांच्या कष्टाचे चीज झाले असून, नवीन वर्षात कोणी घरात बसून एका क्लिकवर आपला सातबारा पाहू शकतो. ई म्युटेशनबाबत काय सांगाल?- ई म्युटेशन म्हणजे एखाद्या जमिनीचे खरेदीखत झाल्यावर त्यात लगेच फेरफार नोंद तयार होऊन आॅनलाईन दुय्यम निबंधकांकडून ती तलाठ्याकडे जाते. १५ दिवसात याबाबत मंडल अधिकारी व तलाठी खातरजमा करुन लगेच खरेदीदार मालकाला १२ दिवसांनी फेरफार उतारा मिळणार आहे. ही नोंद लगेच सातबारावर होणार असून, सातबारा लगेच मिळेल. त्यासाठी यापूर्वी होणारी यातायात टळली आहे, असे हजारे यांनी स्पष्ट केले. सातबारावरील ए. कु. प. व अ. पा. क.चे काय झाले ?- सातबारावर यापूर्वी एकत्र कुटुंबप्रमुख (ए.कु.प.) व एखादा अज्ञान पालककर्ता (अ.पा.क.) असेल तर अज्ञान पालक अशी नोंद होत असे. त्यामुळे इतर वारस गुलदस्त्यात राहात होते. त्यातून अनेक अडचणी समोर आल्या. तक्रारी वाढल्या. २००३मध्ये शासनाने याबाबत परिपत्रक काढले होते. परंतु, त्या कामाला पाहिजे तशी गती मिळाली नव्हती. ते अपूर्ण होते. म्हणून आता आपण याबाबत खातरजमा करुन ए. कु. प.ऐवजी सर्व वारसांची सातबारावर नोंद केली आहे, तर अज्ञान पालकांबाबतही योग्य ती माहिती घेऊन सज्ञान झालेल्यांची वारस म्हणून रितसर नोंद केली आहे. चिपळूणमध्ये ११८६, तर गुहागर ४३९ मिळून १६२५ सातबारा ए. कु. प.चे होते, तर चिपळूणमध्ये ४०९ व गुहागरमध्ये १७५ मिळून ५८४ अज्ञान पालकचे सातबारा होते. ही मोहीम आता यशस्वी झाली आहे. चावडीवाचन कार्यक्रमाअंतर्गत ग्रामसभेत सातबाराचे वाचन करुन जे मयत आढळतात, त्यांचा वारस तपास पूर्ण करुन सातबारावर नोंद होते. चिपळूणमध्ये २३११ व गुहागरमध्ये ८२१ असे एकूण ३१३२ मयत खातेदार आढळले असून, त्यांचा मृत्यूदाखला घेऊन त्यांची नावे सातबारावरून कमी करण्यात आली . सातबारावरील बोजे कसे कमी केलेत? - आपल्याकडे सातबारावर बँका किंवा विविध कार्यकारी सोसायट्यांचे बोजे होते. यातील अनेक बँका व सोसायट्या बंद झाल्या. अनेकांनी कर्जही फेडले. परंतु, सातबारावरील नोंदी कायम राहिल्या. त्या आता कालबाह्य झाल्या. बँका व सोसायट्यांनी तलाठ्यांना न कळविल्यामुळे ही प्रक्रिया तशीच सुरु राहिली. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेताना अडचण येत होती. हे प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरु केले. चिपळूण तालुक्यात ४०२८ व गुहागर तालुक्यात ६१२५ सातबारावर बँकांचा बोजा होता, तर चिपळूणमध्ये १२७७४ व गुहागरमध्ये ६७६७ सातबारावर सोसायटीचा बोजा आढळून आला. गाव कामगार तलाठ्याकडून या सातबारांची यादी घेऊन तसे पत्र आम्ही तहसीलदारांमार्फत बँका व सोसायट्यांना पाठविल्या आहेत. त्याचे उत्तर आल्यानंतर खातरजमा करुन बोजा कमी केला जाईल. नजराणा फीबाबत काय?- आपल्याकडे नियंत्रित सत्ता प्रकारात कुळांना मिळालेल्या जमिनी आहेत. पूर्वी हा निसप्रचा शेरा उठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागे. शासनाच्या नवीन धोरणानुसार आता ही गरज नाही. गावात तलाठ्याकडे आणेवारीच्या ४० पट आकारणी करुन जमीन खालसा करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. चिपळूणमध्ये अशा ३९४९६, तर गुहागरमध्ये २२३७० जमिनी आहेत. शेतकऱ्यांनी तलाठ्याला भेटून पूर्तता करावी.- सुभाष कदम
सातबारा आता घरबसल्या एका क्लिकवर
By admin | Updated: December 29, 2014 23:42 IST