देवगड : शिरगाव येथील मुरूगेश गवंडर खून प्रकरणातील आरोपी क्र. २ दत्ताराम पंधारे हा कोल्हापूर शाहूपुरी येथील एका रेस्टॉरंटमध्ये आचारी म्हणून कामाला असल्याची माहिती मिळाल्यावरून देवगड पोलिसांनी मंगळवारी रात्रीच तेथून त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी देवगड पोलीस निरीक्षक अरविंद बोडके व त्यांची टीम यांनी कारवाई केली. संशयिताची कसून चौकशी करून गुरूवारी त्याला देवगड न्यायालयात हजर करू, अशी माहिती पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी दिली आहे. या प्रकरणामध्ये दत्ताराम पंधारे हा गेली काही वर्षे कुडाळ येथील अत्यंत दुर्गम भागातील पंधारेवाडीमध्ये आपल्या कुटुंबासह राहत होता. मुरूगेश याचा खून झाल्यानंतर काही दिवस तो शिरगावातील एका परमीट रूममध्ये कामाला होता. तेथून तो कोल्हापूरला एका उपाहारगृहात आचारी म्हणून कामाला लागला. मुरूगेशच्या पत्नीच्या अपघाती मृत्यूनंतर दत्ताराम काहीसा निर्धास्त बनला होता. हा खून पचवला असे त्याला वाटू लागले होते. त्यामुळे कोल्हापूरात तो उघडपणे काम करू लागला. देवगड पोलिसांनी कुडाळ पंधारेवाडीमध्ये त्याच्या राहत्या घरी चौकशी चालवली होती. परंतु चौकशीला घरच्या मंडळींनी जराही सहकार्य केले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे आपल्या पद्धतीने ग्रामस्थांमार्फत हळूहळू धागेदोरे जुळवत पोलिसांनी तो काम करीत असलेल्या उपाहारगृहाबाबत माहिती मिळवली. त्यानंतर अचानक छापा टाकून दत्ताराम पंधारे याला मंगळवारी रात्री कोल्हापूरहून ताब्यात घेण्यात आले. ३ जानेवारी २०१० या दिवशी मुरूगेशची पत्नी भारती व दत्ताराम यांनी मुरूगेश दारूच्या नशेत घरात झोपलेला असताना त्याच्या डोक्यात डाव्या बाजूला दगडी पाटा घालून एका घावातच त्याचा खून केला होता. मात्र, शेवटी खुनाला वाचा फुटली आहे. प्रथम भारतीचा अपघाती मृत्यू झाला होता. आता दत्ताराम पंधारे पोलिसांच्या ताब्यात सापडून न्यायाचे चक्र पूर्णपणे फिरले आहे. (प्रतिनिधी)
दुसऱ्या आरोपीला कोल्हापूरात अटक
By admin | Updated: July 30, 2014 22:58 IST