सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात गुरुवारी सायंकाळी परतीच्या पावसाने झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. ओटवणे भटवाडी येथे वीज पडून आई व मुलगा जखमी झाला आहे. त्यांना येथील कुटिर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी युवकाचे नाव ज्ञानेश्वर केशव मुळीक तर आईचे प्रभावती केशव मुळीक असे आहे. सावंतवाडी तालुक्यात गुरूवारी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून, विजेचा लपंडाव तसेच वादळी वाराही सुटला होता. सायंकाळी ओटवणे येथे मुळीक यांच्या घराच्या भेगा गेलेल्या भिंतीतून वीज आत शिरली आणि तिने ज्ञानेश्वर मुळीक यांच्या पायाचा वेध घेतला. तर त्याची आई प्रभावती या शेजारी बसलेल्या असल्याने त्यांनाही धक्का बसल्याने त्याही जखमी झाल्या. या दोघांवर सावंतवाडी कुटिर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या जखमींबाबत महसूल विभागात नोंद उशिरापर्यत करण्यात आली नव्हती. (प्रतिनिधी)
सावंतवाडी : वीज पडून आई-मुलगा जखमी
By admin | Updated: September 25, 2014 23:27 IST