लांजा : पंचायत समिती सदस्यांचे गण तसेच जिल्हा परिषद सदस्यांचे गट यांच्यामधून शिवसेनेचे विद्यमान आमदार राजन साळवी यांना सर्वाधिक मते कोणता गण व गट देणार या विषयाच्या जणू काही स्पर्धा लागल्या होत्या. खानवली पंचायत समिती गण व गवाणे जिल्हा परिषद गटाने सर्वाधिक मते मिळवण्यात बाजी मारल्याचे दिसून आले आहे.विधानसभा निवडणुकीमध्ये सात पंचायत समिती गण, तर चार जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना सर्वाधिक मताधिक्य कोण देतो, यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य यांच्यात जणू जोरदार स्पर्धा सुरु झाली होती. निवडणुकीच्या निकालानंतर खानवली पंचायत समितीच्या सदस्य लिला घडशी यांनी आपल्या गणामध्ये २ हजार ५९६ मतांची आघाडी दिल्याचे स्पष्ट झाले. गवाणे जिल्हा परिषद सदस्या स्वरुपा साळवी यांनी आपल्या गटामध्ये ४ हजार ४३१ मताधिक्य देऊन बाजी मारली आहे. त्याचबरोबर साटवली पंचायत समिती गणाचे सदस्य सभापती आदेश आंबोलकर यांनी २ हजार ३१५ चे मताधिक्य देऊन दुसरा क्रमांक पटकावला आहे. कुवे पंचायत समिती गणाचे सदस्य व माजी सभापती युवराज हांदे यांनी २ हजार २९० ची आघाडी घेऊन तिसरा क्रमांक पटकावला आहे. देवधे पंचायत समिती गणाचे सदस्य व माजी सभापती चंद्रकांत मणचेकर यांनी आपल्या गणातून २ हजार १८६ मतांचे मताधिक्य दिले. वेरवली गणाच्या सदस्य व विद्यमान सभापती दीपाली दळवी यांनी १ हजार ८४५चे मताधिक्य दिले. त्याचबरोबर गवाणे पंचायत समिती गणाचे सदस्य माजी उपसभापती लक्ष्मण मोर्ये यांनी १ हजार ८३५ मते दिली. भांबेड पंचायत समिती गणाच्या सदस्या प्रियांका रसाळ यांनी आपल्या गणातून १ हजार ७८७ मतांचे लीड दिले आहे. तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जगदीश राजापकर यांच्या भांबेड गटातून ४ हजार ७७चे मताधिक्य मिळाल्याने त्यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच देवधे जि.प. गटाचे सदस्य दत्ता कदम यांनी आपल्या गटातून ४ हजार ०३१ मताधिक्य दिले आहे. सातही गणात शिवसेनेचे चांगले मताधिक्य दिसून येत असताना पूर्वचा लांजा पं.स. गण सध्याचे शहरामध्ये शिवसेनेला मताधिक्य घेता आले नसल्यसाचे दिसून येत असून शहरामध्ये शिवसेनेला केवळ १ हजार २८८ मते मिळवता आल्याने अजूनही लांजा शहरामध्ये शिवसेना रुजू शकलेली नाही हे स्पष्ट झाले आहे. लांजा तालुक्यातून शिवसेनेला १६ हजार १४२ चे मताधिक्य साळवी यांना मिळाले आहे. (प्रतिनिधी)
गवाणे गटात साळवींना सर्वाधिक मताधिक्य
By admin | Updated: October 23, 2014 22:52 IST