सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात विक्रेत्यांकडून बोगस मेमरीकार्ड विकले जावून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार उघड झाले आहेत. १६ ते २२ जीबीचे मेमरीकार्ड अवघ्या २० ते २५ रुपयांत विकली जात आहेत. मात्र ही मेमरी कार्ड नसून प्लास्टिकचे रंगवलेले छोटे तुकडे असल्याचे निष्पन्न झाले आहेत.सध्या मोबाईलचा वापर सगळीकडे सर्रास होताना दिसून येत आहे. यात मेमरीकार्ड वापरले जाते असे मोबाईल मोठ्या प्रमाणात असतात. याचाच फायदा घेऊन काहीजणांनी बोगस मेमरी कार्ड विकून ग्राहकांची लूट सुरु केली आहे. मुंबईमध्ये असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असून या विक्रेत्यांनी आता सिंधुदुर्ग जिल्हाही आपले लक्ष्य केले आहे. सिंधुदुर्गातही अशी बोगस मेमरीकार्ड विकले जात असल्याचे उघड झाले आहे.मेमरी कार्ड किंमती खूप असतात. यात ४ जीबी, ८ जीबी, १६ जीबी, ३२ जीबी अशी मेमरी कार्ड मिळतात. ओरीजिनल मेमरीकार्डची किंमत २५० पासून १ हजारपर्यंत असते. मात्र ही बोगस मेमरी कार्ड किरकोळ रुपयांना विकली जातात. ३२ जीबीचे मेमरीकार्ड ५० रुपयांना तर १६ जीबीचे मेमरीकार्ड २० रुपयांना विकले जाते. खऱ्या मेमरीकार्डप्रमाणेच या मेमरीकार्डचे पॅकींग असल्याने लोक फसतात. मात्र या मेमरीकार्डऐवजी प्रत्यक्षात काळ्या रंगाचे मेमरीकार्डच्या आकारात तयार केलेला व रंगवलेला प्लास्टिक तुकडा असतो. त्यामुळे अशा फिरत्या विक्रेत्यांकडून एखादी वस्तू घेताना सावधानता बाळगावी, असे आवाहन फसगत झालेल्या व्यक्तींनी केले आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात बनावट मेमरी कार्डाची विक्री
By admin | Updated: November 26, 2014 00:01 IST