राजापूर : लोकसभेसह विधानसभा निवडणुकीत जबरदस्त यश मिळवत आपला झंझावात निर्माण करणाऱ्या शिवसेनेला ग्रामपंचायत निवडणुकीतही तो करिष्मा राखता आला. विरोधकांकडून १४ ग्रामपंचायती खेचून आणणाऱ्या शिवसेनेने ५१ पैकी ३८ ग्रामपंचायतींवर भगवा फडकावला, तर दुसरीकडे काँग्रेसला सात, राष्ट्रवादीला दोन व भाजपला तीन ग्रामपंचायतींवर विजय मिळवता आला. अत्यत प्रतिष्ठेची समजल्या गेलेल्या सोलगाव ग्रामपंचायतीमध्ये दोन उमेदवारांना समान मते पडल्याने चिठी टाकण्यात आली व तो निर्णय शिवसेनेच्या विरोधात गेल्याने तेथील ग्रामपंचायत गाव पॅनेलकडे गेली. निकालाअंती शिवसेनेने अणसुरे, शीळ, आंबोळगड, धोपेश्वर, ओणी, कोदवली, रायपाटण, वाडापेठ, कोंडसर बु., वाल्ये, ससाळे, मोसम, कुंभवडे, तारळ, पडवे, मंदरुळ, गोठणे, दोनिवडे, शिवणे खुर्द, महाळुंगे, येरडव, पन्हळेतर्फ सौंदळ, कोळंब, गोवळ, चुनाकोळवण, करक, पांगरीखुर्द, हरळ, जवळेथर, काजिर्डा, फुफेरे, ताम्हाने, तुळसवडे, आडवली, परटवली, उन्हाळे, पांगरे बुद्रुक, तळगाव व कशेळी या ग्रामपंचायतींवर भगवा फडकवला. यामध्ये शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीकडून चौदा ग्रामपंचायती खेचून आणल्या. त्यामध्ये मागील अनेक वर्षे सेनेला हुलकावणी देणाऱ्या तळगावसह गोठणे दोनिवडे, फुफेरे, करक, महाळुंगे इत्यादी महत्त्वपूर्ण ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तसेच राष्ट्रवादीकडे असलेली जवळेथर ग्रामपंचायत यावेळी शिवसेनेने आपल्या ताब्यात घेतली आहे. दुसरीकडे गतवेळी २३ ग्रामपंचायती ताब्यात असलेल्या काँग्रेसला यावेळी केवळ सात ग्रामपंचायती जिंकता आल्या. त्यामध्ये दोनिवडे, ओशिवळे, चिखलगाव, मिळंद, निवेली, कुवेशीसह कारवलीवर विजय संपादन करता आला. सहा ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखताना काँग्रेसने शिवसेनेकडील कारवली ग्रामपंचायत खेचून आणली. राष्ट्रवादी काँग्रेसवर हातदे व दळेवर विजय मिळाला.भाजपचे तालुक्यात नगण्य स्थान होते. तथापि यावेळी भाजपने सौंदळ, मोरोशी, कोंडिवळे या ग्रामपंचायतींवर दणदणीत यश मिळवून आपले खाते उघडले आहे. तालुक्यात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या सोलगाव ग्रामपंचायतीमध्ये एकूण सात जागांपैकी शिवसेना व गाव पॅनेलला प्रत्येकी तीन जागा मिळाल्या होत्या, तर एका जागेसाठी सेनेतर्फे सतीश बाणे व गाव पॅनेलकडून नामदेव केशव गिजम यांना समान म्हणजे प्रत्येकी १५७ एवढी, तर नोटाला १२ मते पडल्याने तो निर्णय चिठीवर ठरवण्यात आला. एका लहान मुलीकडून चिठी काढण्यात आली. त्यामध्ये गाव पॅनेलचे नामदेव गिजम हे विजयी झाले व सेनेच्या हातातील ग्रामपंचायत गावपॅनेलकडे गेली. विजयी उमेदवारांत दोनिवडे गावात सरपंच दीपक बेंद्रे, ओणीचे सरपंच वसंत जड्यार, रायपाटणचे उपसरपंच महेश पळसुलेदेसाई, नुकतेच निधन झालेले तालुका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संदीप हातणकर यांच्या पत्नी संपदा हातणकर, करकचे माजी सरपंच विलास नारकर, कारवलीचे माजी सरपंच प्रकाश दसवंत आदींचा समावेश होता. काही प्रभागात धक्कादायक निकाल लागले. चार ते पाच मतांच्या फरकाने पराभव स्विकारणाऱ्या उमेदवारांप्रमाणे दोनशेपेक्षा जास्त मतांनी विजय संपादन करणारे उमेदवार देखील निवडून आले आहेत. राजापूर पंचायत समितीचे उपसभापती उमेश पराडकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या रायपाटण ग्रामपंचायतीमध्ये सेनेने सर्वच्या सर्व म्हणजे नऊही जागा जिंकून आपला विजयी रथ कायम ठेवला. पंचायत समिती सदस्य दीपक नागले यांनीही आपल्या कोंडसर बु. या ग्रामपंचायतीच्या सर्व अकरा जागा जिंकल्या. तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र नागरेकर यांच्या शीळ ग्रामपंचायतीमध्ये यावेळी काँग्रेसने तीन जागा जिंकून ग्रामपंचायतीमध्ये पुन्हा प्रवेश मिळवला आहे. (प्रतिनिधी)
राजापुरातील ३८ ग्रामपंचायतींवर फडकला शिवसेनेचा भगवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2015 01:27 IST