ओटवणे : ऐका हो ऐका... चोपदार सरदार तसे... ओटवणेचे न्यायाधीश पालखीत बसे...सावधान... सावंतवाडी राजेशाही संस्थानची परंपरा लाभलेल्या येथील श्री देव रवळनाथाची राजेशाही पालखी मिरवणुकीचे सूर ओटवणे परिसरात चहुबाजूंनी गुंजू लागले आहेत.सुमारे साडेचारशे वर्षांचा सावंतवाडी संस्थानाचा वारसा लाभलेल्या ओटवणे गावात धार्मिक रीतीरिवाज अजूनही राजेशाही पद्धतीने साजरे केले जातात. ओटवणे श्री देवी सातेरी- रवळनाथ पंचायतन देवस्थानातील श्री देव रवळनाथाचा पालखी सोहळा म्हणजे एक राजेशाही उत्सव. कोजागिरी पौर्णिमेपासून सुरू झालेला हा पालखी सोहळा जवळजवळ महिनाभर चालतो. यामध्ये दरदिवशी ढोल-ताशांसह मंदिराच्या सभोवताली रवळनाथाची पालखी मिरवणूक काढली जाते. यावेळी गावातील मान-मानकऱ्यांसह दैविक सेवक धार्मिक सेवेत परंपरेनुसार भाग घेतात. यावेळी भजन-कीर्तनाचा कार्यक्रमही रंगतो. गावातील पुरोहित ब्राम्हणाकरवी पोथी-पुराण ग्रंथाचे वाचनही आजही परंपरेनुसार सुरू आहे. गाव रहाटीतील बारा बलुतेदार पद्धतीची ओळख या सोहळ्यात पहायला मिळते. बारा बलुतेदारातील सेवक आपले धार्मिक काम वारसा हक्काने पुढे चालवित आहेत. (प्रतिनिधी)ब्राम्हणस्थळाच्या भेटीनंतर सांगताजवळ -जवळ महिनाभर चालणाऱ्या या उत्सवाची सांगता पंच फणाच्या नागाच्या, म्हणजेच ब्राम्हणस्थळाच्या भेटी नंतर केली जाते. ब्राम्हणस्थळ म्हणजे ज्या ठिकाणी सावंतवाडी संस्थानच्या पहिल्या-वहिल्या राजाला, म्हणजे श्रीमंत राजेसाहेब खेम सावंत भोसले यांना पंचफणी नागाचा साक्षात्कार झाला होता, त्या ठिकाणी भेट देऊन पालखी सोहळ्याची सांगता केली जाते.
रवळनाथाची राजेशाही मिरवणूक
By admin | Updated: November 5, 2014 23:32 IST