सावंतवाडी : कोलगावात शिवसेनेने विजयानंतर जल्लोषी मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही मिरवणूक पोलिसांनी रोखली. या प्रकाराने काहीकाळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत शाब्दिक चकमकही उडाली. यावेळी पोलिसांनी आमच्याकडे तक्रार असून, गुरुवारी मिरवणूक काढता येणार नाही, असे स्पष्ट केले. तरीही कार्यकर्त्यांनी छोटेखानी मिरवणूक काढली. यावेळी मिरवणुकीवर दगडफेकीचा तुरळक प्रकार घडला. यात कोणी जखमी झाले नाही. याबाबतची तक्रार केल्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. कोलगाव ग्रामपंचायतीवर दहा वर्षांनंतर शिवसेनेची सत्ता आली आहे. अनेकांनी एकतर्फी विजयाचे रूपांतर जल्लोषी मिरवणुकीत करण्याचे आडाखे बांधले होते. त्यामुळे सावंतवाडीत विजयाचा गुलाल उधळल्यानंतर कार्यकर्ते थेट कोलगाव येथे गेले. यावेळी मिरवणुकीची तयारी सुरू असतानाच अचानक पोलिसांनी मिरवणूक काढायची नाही, असे म्हणत मिरवणुकीला परवानगी घेण्यात आली नाही, त्यामुळे मिरवणूक काढू नये, असे सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांवर आरोपाच्या फैरी झाडत, आम्हालाच मिरवणूक काढण्यास का देत नाही. यापूर्वी अनेक निवडणुका झाल्या, त्यावेळी विरोधकांनी मिरवणुका काढल्या त्या कशा, असे सवाल केले. यावेळी पोलीस आणि शिवसेना कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. पोलीस उपनिरीक्षक दिलीप वेडे व जयदीप कोळेकर यांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला; पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. आम्ही मिरवणूक काढणार, असे कार्यकर्ते सांगत होते. आपल्या विरोधात लेखी पत्र असून, मिरवणुकीनंतर शांतता बिघडू शकते, असे पोलिसांनी सांगितले. त्यावर ते पत्र आम्हाला दाखवा, अशी आग्रही मागणी केली. यावेळी पोलीस निरीक्षक रणजित देसाई गावात दाखल झाले आणि यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शांततेत मिरवणूक काढण्यास परवानगी देण्यात आली. मिरवणूक सुरू झाल्यानंतर काही अंतरावर गेली असता अचानक मिरवणुकीवर दगडफेकीची तुरळक घटना घडली. यामध्ये दोन ते तीन दगड कार्यकर्त्यांच्या हाताला व पायाला लागून दुखापत झाली. याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस कोलगाव येथे दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी पाहणी केली. दरम्यान, दगड मारणारे परिसरातून निघून गेले होते. त्यानंतर शांततेत मिरवणूक पार पडली.
मिरवणुकीवर दगडफेक
By admin | Updated: April 24, 2015 01:31 IST