शिरीष नाईक ल्ल कसई दोडामार्गपर्यटनाला चालना मिळावी, यासाठी तिलारी धरणाच्या बाजूला कोकण पॅकेजमधून ‘रॉक गार्डन’ बांधण्यात आले. मात्र, या रॉक गार्डनचे काम दर्जेदार करण्यात आलेले नाही. त्यामुळे सद्यस्थितीत या रॉक गार्डनची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे पर्यटनाला खीळ बसली आहे. दोडामार्ग तालुका नैसर्गिक साधन संपत्तीने समृध्द आहे. अनेक पर्यटनस्थळे आहेत. महाराष्ट्र व गोवा राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या तिलारी आंतरराज्य प्रकल्पामुळे तालुक्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. तिलारी धरण हे पूर्णपणे मातीचे असल्याने या धरणाकडे पर्यटकांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. मांगेली धबधबा, उन्नेयी बंधारा, हनुमान गड, तीर्थक्षेत्र-तेरवण मेढे, वीज प्रकल्प, कसईनाथ अशी विविध पर्यटन स्थळे आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रॉक गार्डनची कमतरता असल्याने तीही पूर्ण करण्यात आली. कोकण पॅकेजमधून ५० लाख रुपये रॉक गार्डनसाठी काही वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आले. तिलारी धरणाच्या बाजूला रॉक गार्डनचे काम हाती घेऊन पूर्ण करण्यात आले. गार्डनचे काम दर्जेदार होण्यासाठी आराखडाही तयार करण्यात आला. परंतु काम दर्जेदार झाले नाही. त्यामुळे केवळ मंजूर झालेला निधी खर्ची करण्यासाठीच रॉक गार्डन निर्माण करण्यात आले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या रॉक गार्डनची अवस्था सद्यस्थितीत बिकट झाली आहे. गार्डनची देखभाल दुरुस्ती करण्यात येत नसल्याने हे गार्डन भकास होत आहे. बाग पूर्णपणे सुकून भकास झाली आहे. त्यामुळे ५० लाख रुपये कुठे गेले, असा प्रश्न पर्यटकांमधून उपस्थित होत आहे. तसेच या रॉक गार्डनची चौकशी केली जावी, अशी मागणी होत आहे. पर्यटनस्थळांना निधी मिळावा, म्हणून शासन निधी उपलब्ध करून देते. मात्र, या निधीचा वापर योग्य रितीने केला जात नाही. त्यामुळे पर्यटनस्थळे विकासापासून वंचित आहेत. मिळालेला निधी सत्कारणी न लावता निकृष्ट कामे केली जात असल्याने पर्यटक पर्यटनस्थळांकडे पाठ फिरवित आहेत. सगळ्यांचेच एकमेकांशी लागेबांधे असल्याने याला आव्हान कोण देणार, हा प्रश्न आहे. या प्रकारांमुळे पर्यटनाला मात्र खीळ बसत आहे.
रॉक गार्डन बनतेय भकास
By admin | Updated: July 1, 2014 00:27 IST