मंडणगड : मंडणगड ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर करण्यात यावे, यासाठी ग्रामपंचायत व्यापारी संकुलाच्या सभागृहात गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत नगरपंचायतीच्या स्वागताचा व पुढील कारवाई त्वरेने करण्याचा ठराव आवाजी मतदानाने पारीत करण्यात आला.शासनाने एप्रिल २०१४मध्ये राज्यातील शहरे व नगर विकासासंदर्भात घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाचा मंडणगड शहराला फायदा झाला. मंडणगड ग्रामपंचायत नगरपंचायतीत परिवर्तीत करण्यासाठी प्रशासकीय हालचालीना वेग आला आहे. नगरपंचायतीची संकल्पना राबवण्यासाठी चौदा सदस्यांच्या अभ्यास समितीची स्थापना गेल्या महिन्यात झालेल्या ग्रामसभेत करण्यात आली होती. या समितीने नगरपंचायतीच्या संकल्पनेचा फायदा- तोट्यांचा दापोली नगरपंचायतीला भेट देऊन अभ्यासही केला.गुरुवारी चारुलता पारेख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत प्रथम समिती सदस्यांनी या दौऱ्यात आलेल्या अनुभवांचे कथन केले़ यात ग्रामस्थ संतोष गोवळे, संजय राणे, वैभव कोकाटे, आदेश मर्चंडे, ग्रामपंचायत सदस्य विनोद जाधव, सुभाष सापटे, यांनी नगरपंचायतीच्या संकल्पनेचे फायदे व तोटे ग्रामस्थांना सांगितले. यानंतर ग्रामस्थांनीही आपली मते मांडली. यात ग्रामस्थ सचिन शेठ, बापू शेठ, शशिकांत परकर, दत्तात्रय भोसले, रघुनाथ पोस्टुरे, प्रवीण जाधव विकास शेट्ये, हरेश मर्चंडे, दिनेश सापटे यांनी मनोगत व्यक्त केले. शहराच्या विकासाकरिता शासनाने नगरपंचायतीच्या रुपाने दिलेल्या सुविधेचा फायदा घेण्याची गरज व्यक्त करताना शासनाने लवकरात लवकर पुढील कारवाईची गरज सर्वांनी व्यक्त केली.नगरपंचायतीच्या संकल्पनेमुळे सामान्य नागरिकांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये, याची काळजी घेऊन नगरपंचायतीची संकल्पना राबवण्याची मते ही ग्रामसभेत मांडण्यात आली. सभेला सरपंच महेंद्र सापटे, उपसरपंच काजोल लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य प्रबोध कोकाटे, राजाराम लेंढे, सेजल गोवळे, विकास नगरकर, विजय भागवत उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मंडणगडला नगरपंचायतीचा ठराव विशेष ग्रामसभेत पारीत
By admin | Updated: January 2, 2015 00:09 IST