सावंतवाडी : राजघराण्यातील अंतर्गत वाद ते कुटुंब सोडवेल. मात्र, याचा फायदा घेऊन काहीजण या संस्थेत शिरकाव करू पाहत असतील त्यांनी सन्मानाने राजीनामे द्यावेत, अन्यथा त्यांची पाळेमुळे खणून काढावी लागतील, असा इशारा आमदार दीपक केसरकर यांनी दिला. तसेच सावंतवाडीची एकजूट यापुढेही कायम ठेवूया, असे आवाहनही आमदार केसरकरांनी केले.दक्षिण रत्नागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वादानंतर नवीन नियामक मंडळ काढून संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा निषेध म्हणून सावंतवाडीतील नागरिक तसेच माजी विद्यार्थी यांची खास सभा पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली. यावेळी अनेक वक्त्यांनी राजघराण्याच्या मागे ठामपणे उभे राहण्याचे ठरवत त्या दुहीवर चौफेर हल्ला चढवला.या निषेध बैठकीत नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, मंगेश तळवणेकर, वसंत केसरकर, काँॅग्रेस नेते संदीप कुडतरकर, बाळा गावडे, संजू परब, अॅड. सुभाष देसाई, अॅड. श्याम सावंत, प्रा.अन्वर खान, नगरसेवक विलास जाधव, संजय पेडणेकर, शर्वरी धारगळकर, किर्ती बोंद्रे, विठ्ठल गवस, यशवंत देसाई, शिवाजी सावंत, काका मांजरेकर, दादा कुडतरकर, अभय पंडित, डी. टी. देसाई, राजू मसूरकर, सतिश सावंत, सिताराम गावडे, श्यामकांत काणेकर उपस्थित होते.यावेळी आमदार केसरकर म्हणाले, सावंतवाडी संस्थान आमची सर्वांची अस्मिता आहे. कै. शिवरामराजे भोसले यांनी जे काम केले आहे ते कोणीच विसरणार नाही. त्यांच्या प्रयत्नातून वृक्ष उभा असून त्या वृक्षावर ही बांडगुळे फोफावत होती. त्यांना आपण वेळीच छाटून टाकले पाहिजे. शिक्षणात कोणीच राजकारण आणू नये जर कोणी या संस्थेत राजकारण आणत असेल तर माझी आमदारकी पणाला लावीन आणि शिक्षण संस्था वाचवेन. आमचा लढा आजच संपलेला नाही. विघ्नसंतोषी लोकांनी आपले राजीनामे द्यावेत आणि यातून बाहेर पडावे अन्यथा त्यांच्या मुळापर्यंत जावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.वसंत केसरकर यांनी राजघराण्याचा अपमान म्हणजे आमचा अपमान आहे म्हणून आज सावंतवाडीकर एक झाला आहे. तालुक्यातील प्रत्येक भागातून शेतकरी यात सहभागी होईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. तसेच जी मंडळी हे कटकारस्थान रचू पाहत आहेत त्यांना मोती तलावात बुडवले पाहिजे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.काँॅग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब म्हणाले, काँॅग्रेस एकत्रितपणे राजघराण्याच्या पाठिशी आहे. जे आमचे कोणी होते, त्यांनी आता राजीनामा दिला आहे. नारायण राणे यांनी दिलेला आदेश आमच्यासाठी महत्त्वाचा असून राजघराण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू, असेही यावेळी परब म्हणाले.काँग्रेस नेते संदीप कुडतरकर यांनी सांगितले की, या सर्व प्रकरणाच्या मुळाशी जाऊन पडद्यामागे कोण शकुनी मामा आहे त्याला पहिल्यांदा जनतेसमोर आणले गेले पाहिजे. इतर तालुक्यातील व्यक्तिंनी इथे येऊन आम्हाला राजकारण शिकवू नये आणि आमच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्नही करू नये. आम्ही गप्प बसणार नाही. सावंतवाडीची एकजूट ही पक्षभेद विसरून दाखवून देऊ. जे ही संस्था ताब्यात घेऊ इच्छितात, त्यांनी कळणे, बांदा येथे जे पराक्रम केले आहेत. त्याची सर्वांना माहिती आहे. त्यामुळे सावंतवाडीतील जनता यांना कधीही थारा देणार नाही, असा टोला त्यांनी यावेळी हाणला.नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सावंतवाडीची जनता राजघराण्याच्या मागे ठामपणे उभी आहे आणि यापुढेही राहिल, असे स्पष्ट केले. तसेच आमच्या अस्मितेवर कोणी घाला घालू नये, त्याला त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असेही यावेळी साळगावकर म्हणाले.उपनगराध्यक्ष राजन पोकळे म्हणाले, सावंतवाडी संस्थान हे सर्वांसाठी आदराचे स्थान आहे. आम्ही या संस्थेत शिकलो पण काहींनी मध्यंतरी आपली मक्तेदारी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. पण आता त्यांचा डाव फसला असून खरा सूत्रधार कोण, तो जनतेसमोर यावा, अशी मागणी त्यांनी केली.अॅड. सुभाष देसाई यांनी सांगितले की, कोणीही नेतृत्व करा पण ही संस्था वाचवा. हा लढा पुढे असाच सुरू ठेवा. आम्हाला लढण्याची इच्छा नाही. पण कोण जर वाट्याला येत असेल, तर सर्वांनी एकी दाखवावी, असे आवाहन देसाई यांनी यावेळी केले.माजी प्राध्यापक डी. टी. देसाई म्हणाले, मी सभासद केले नाहीत, माझ्यावर खोटे आरोप केले पण कळणे या एका गावातील जर तीनशे सभासद होत असतील तर इतर जिल्ह्यातून सभासद झाले तर काय चुकले. आम्हाला कॉलेज वाचवायचे आहे. दोन महाशयांनी या कॉलेजमधील शिक्षकांची अवस्था उसाच्या चिपाडासारखी करून ठेवली होती. त्याला कुठेतरी लगाम घातला गेला पाहिजे होता म्हणून आम्ही एकसंघ झालो आणि त्यातूनच आम्हाला इतर शिक्षकांनी साथ दिली. शिवराम राजेनी आम्हाला जी प्रेरणा दिली, ती आमच्या रक्तात भिनली असल्याचेही त्यांनी सांगितले. या निमित्ताने सदासेन सावंत, अॅड. सुभाष पणदूरकर, विठ्ठल गवस, बाळा गावडे, शिवाजी सावंत, काका मांजरेकर, सिताराम गावडे आदींनी यावेळी भाषणे केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नकुल पार्सेकर यांनी केले.एका वक्त्याने आपल्या भाषणात शिक्षकांनी कसा सुटकेचा निश्वास सोडला, ते सांगत असतानाच यापूर्वी हा उंदीर मारला पाहिजे होता. पण उंदीर मारला असता तर आमच्या गणपतीला राग आला असता, म्हणून सर्वजण याचे कारस्थान सहन करत राहिले, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)शकुनीमामा शोधाहे एवढे रामायण घडले यामागे कोणीतरी शकुनीमामा आहे. त्याचा येथील जनतेने शोध घ्यावा. जो आमच्यामध्ये फूट पाडण्यास आला असून त्याला वेळीच हद्दपार केले पाहिजे. बाहेरची गुंडगिरी येथे चालवू देऊ नका, अशी मते वक्त्यांनी मांडली.
सन्मानाने राजीनामे द्या
By admin | Updated: December 1, 2014 00:18 IST