वैभव साळकर - दोडामार्ग -तालुक्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच होणाऱ्या कसई दोडामार्ग नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात भाजपसोबत सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. तर भाजप तूर्तास सावधगिरीने घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आघाडी करण्याच्या सकारात्मकतेत आहेत. दरम्यान, नगरपंचायत झाल्यानंतर पहिलीच निवडणूक असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीसह सेना-भाजपासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. तत्कालीन काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात तालुका ठिकाणची ग्रामपंचायत नगर पंचायतीत रुपांतरीत करण्याचा अध्यादेश निघाला होता. त्याची अंमलबजावणी सेना-भाजपा युतीच्या काळात होत असून, त्या अनुषंगानेच कसई दोडामार्ग ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रुपांतर झाले आहे. पूर्वी ११ सदस्यसंख्या होती. नगरपंचायत झाल्याने ही संख्या १७ वर पोहोचली आहे. शिवाय वॉर्ड रचनादेखील बदलणार असून, प्रत्येकी एका वॉर्डमधून एकच उमेदवार निवडून येणार आहे. त्यामुळे १७ वॉर्डमध्ये १७ उमेदवार शोधण्याचे काम राजकीय पक्षांना करावे लागणार आहे. तालुक्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच नगरपंचायतीची निवडूक असल्याने तालुक्यातील सेना-भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी ती प्रतिष्ठेची बनली आहे. नगर पंचायतीच्या या लगीनघाईत शिवसेना सगळ्यात पुढे असून, नुकत्याच पार पडलेल्या सेनेच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे तालुकाध्यक्ष बाबुराव धुरी यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीवर भगवा फडकविण्याची धुरा उपतालुकाध्यक्ष गोविंद महाले, शहराध्यक्ष शाणी बोर्डेकर, शाम खडपकर, विनायक मणेरीकर व जीवन सावंत यांच्यावर राहणार आहे. आपल्या मित्रपक्षाने जाहीर केलेल्या स्वबळाच्या भूमिकेवर एरव्ही गळ्यात गळा घालून राज्यात वावरणाऱ्या भाजपाने मात्र आपली कोणतीच भूमिका स्पष्ट केलेली नाही. सध्या भाजपाची नेतेमंडळी सावध भूमिकेत असून, इतर राजकीय पक्षांच्या घडामोडींवर बारीक नजर ठेवून आहेत. याठिकाणी सेनेपेक्षा भाजपाचे पारडे जड दिसत असून शहराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्यावर निवडणुकीत मोठी धुरा असणार आहे. जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर आणि तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस यांच्या कल्पक नेतृत्वामुळे भाजप निवडणुकीत चांगलीच रंगत आणू शकेल. शिवाय कें द्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने त्याचा फायदा सत्ताधारी म्हणून भाजपाला काही प्रमाणात होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर गळ्यात-गळा घालून असून निवडणुकीत आघाडी करण्यासाठी सकारात्मक आहे. तशा वाटाघाटीदेखील पडद्यामागून सुरू आहेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला ही निवडणूक म्हणावी तशी कठीण जाणार नाही. शिवाय गेली अडीच वर्षे ग्रामपंचायतीची ही सत्ता काँग्रेसकडे होती. काँग्रेसचे युवा सरपंच म्हणून संतोष नानचे यांनी कसई दोडामार्ग शहरात चांगलीच छाप पाडली आहे. रस्ते, पाणी, आरोग्य आदी विविध क्षेत्रात लाखो रुपयांची विकासकामे शहरासाठी आणून कसई दोडामार्गवासीयांना अच्छे दिन आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविताना गेल्या अडीच वर्षात झालेल्या लाखो रुपयांच्या विकासकामांचा फायदा काँग्रेसला होण्याची दाट शक्यता आहे. शिवाय राष्ट्रवादीचे नेते सुरेश दळवी देखील राजकारणात सक्रीय झाले आहेत. दळवींना मानणारा जुनाजाणता वर्ग आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची साथ काँग्रेसला अधिक बळकटी आणणारी ठरेल. एकंदरीत नगरपंचायतीची ही तालुक्यातील पहिलीच निवडणूक असल्याने रणनीती आखताना राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींची धावपळ उडणार असून, ही निवडणूक प्रत्येकाचे अस्तित्व दाखवून ठेवणारी ठरणार आहे.उमेदवार शोधताना...कसई दोडामार्ग ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रुपांतर झाल्यानंतर प्रथमच निवडणूक होत असल्याने वार्ड रचनाही बदलण्यात आली आहे. पूर्वी चार वार्डात होणारी ग्रामपंचायत निवडणूक आता नगर पंचायतीनंतर १७ वार्डात होणार आहे. या १७ वार्डात १७ उमेदवार आरक्षणानुसार शोधण्याचे आव्हान राजकीय पक्षांसमोर असणार आहे. शिवाय ५० टक्के महिलांना आरक्षण असल्याने १७ मधील किमान आठ सदस्य या महिला उमदेवार असणार आहेत. त्यामुळे महिला उमेदवार शोधताना सर्वच राजकीय पक्षांची दमछाक होणार आहे.
नगरपंचायतीसाठी प्रतिष्ठा पणाला
By admin | Updated: August 2, 2015 20:41 IST