देवगड : आरोग्याच्या दृष्टीकोनातून जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून देवगड ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करून पुरवणी बजेटमध्ये आर्थिक तरतूद करणार असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.देवगड दौऱ्यावर आलेले देवगडचे सुपुत्र डॉ. दीपक सावंत यांनी देवगड ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. त्यानंतर शासकीय विश्रामगृह देवगड येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, देवगड ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्यासाठी प्रस्ताव पाठवा असे सांगितले. इमारतीसाठी पुरवणी बजेटमध्ये आर्थिक तरतूद करण्यात येईल. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत त्रुटी बऱ्याच प्रमाणात आहेत. या त्रुटी दूर करून चांगली सेवा उपलब्ध करून देण्यावर लक्ष दिले जाईल. प्रत्येक प्राथमिक आरोग्यकेंद्रामध्ये सेमी अॅटो अॅनालायझर बसविण्याचा विचार असून पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यातील ३८ प्राथमिक आरोग्यकेंद्रांपैकी २५ आरोग्य केंद्रात बसविण्यात येणार आहेत व दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित १३ आरोग्यकेंद्रात बसविण्यात येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. प्राथमिक आरोग्यकेंद्रातील काही इमारतींची दयनीय अवस्था झाली असून त्या इमारतींची दुरुस्ती करण्यात येईल व प्रत्येक आरोग्यकेंद्रात वैद्यकीय अधिकारी देण्यात येईल. विषयतज्ज्ञ व डॉक्टरची कमतरता असून देवगड तालुका हा डोंगरी भाग व दुर्गम भागात वसलेला असल्याने या तालुक्यात डॉक्टरांची रिक्त पदे तत्काळ भरण्यात येतील. एनआरएचएम अंतर्गत कोल्हापूर येथून प्रायोगिक तत्वावर स्त्री रोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ यांची नियुक्ती करण्याचा विचार केला जात आहे. अस्थायी डॉक्टरांच्याविषयी मॅग्मो संघटनेच्या प्रमुख मागण्यांबाबत चर्चा करून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. तसेच सिंधुदुर्गासह देवगडमध्ये आरोग्य व्यवस्थेबद्दल मी समाधानी नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. १०८ रुग्णवाहिका सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. जिल्हा रुग्णालय सोयी सुविधांनीयुक्त बनविणार असल्याचेही डॉ. सावंत यांनी सांगितले. (वार्ताहर)अधिकारी, ग्रामस्थ वेटींगवरदेवगड ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी, ग्रामस्थ आरोग्यमंत्र्यांची वाट पहात असतानाच आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे देवगडमधील खासगी गाठीभेटी घेत राहिल्याने ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व ग्रामस्थांना ‘वेटींगवर’ रहावे लागले.
आरोग्य यंत्रणेतील त्रुटी दूर करणार
By admin | Updated: January 5, 2015 00:35 IST