सावंतवाडी : पंधरा वर्षानंतर कोकणातील राक्षसी महत्त्वाकांक्षा शिवसेनेने संपवली आहे. आम्ही कोकणला दिलेला लाल दिवा हा विकासाचा आहे. यापूर्वी लाल दिवा दिसला की, कोकणातील जनता घाबरायची. पण आजच्या लाल दिव्याचे अभिमानाने स्वागत करते, अशी जोरदार टोलेबाजी शिवेसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सावंतवाडी महोत्सवात केली. यावेळी सावंतवाडी नगरपालिकेच्या पर्यटन महोत्सवाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन तसेच राज्यमंत्री दीपक केसरकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक, बेस्टचे चेअरमन अरुण दुधवडकर, पल्लवी केसरकर, नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, स्रेहा तेंडोलकर, रुपेश राऊळ, सिध्दी परब, जान्हवी सावंत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, विजयकुमार द्वासे आदी उपस्थित होते. यावेळी नव्यानेच राज्यमंत्री झालेल्या दीपक केसरकर यांचा शाल, श्रीफळ, गणेशमूर्ती व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर बोलताना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी नारायण राणे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. जिल्ह्यात शिवसेना विकासाची गंगा आणेल. केसकरांना मिळालेला लाल दिवा हा जनतेच्या विकासाचा आहे. घाबरण्याचे काहीही कारण नाही. यापूर्वी लाल दिवा दिसला, की जनता घाबरायची. कोण पाकीटमार आला की जमीन लुटायला आलाय, असे जनतेच्या मनात असायचे. पण आता ही भीती दूर झाली आहे. पंधरा वर्षांनी राक्षसी महत्त्वाकांक्षेला शिवसेनेने संपविले आहे, असे यावेळी आदित्य ठाकरे म्हणााले. यावेळी आमदार वैभव नाईक, राज्यमंत्री दीपक केसरकर यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबन साळगावकर यांनी केले. या महोत्सवानिमित्त चित्रप्रदर्शन व विक्री तसेच फूड फेस्टिव्हल, श्रीमंत शिवरामराजे कलादालन येथे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार एस. बी. पोलाजी यांच्या शिष्यांचे चित्रप्रदर्शन तसेच मोती तलावातील तरंगत्या तराफ्यातील शोभा यात्रेचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. या महोत्सवाच्या उद्घाटनानिमित्त युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे प्रथमच सावंतवाडीत येऊन श्रीमंत शिवराम राजे कलादालनाजवळ आल्यानंतर त्यांचे ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले. तसेच सुहासिनींच्या हस्ते औक्षण करून कलादालनातील चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन केले. कलादालन येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार एस. बी. पोलाजी यांच्या शिष्यांनी भरविलेल्या चित्रप्रदर्शनाची पाहणी करत आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले. (प्रतिनिधी)भव्य देखाव्यांनी लक्ष वेधलेशोभायात्रेमध्ये इंद्रायणी ग्रुप, खासकीलवाडा यांनी राम वनवास दर्शन हा देखावा, माऊली कला मंच (सोनुर्ली)-महिषासूरमर्दिनी, कलाविकास गु्रप, वराड-मालवण-पारंपरिक दशावतार, कृष्णा महादेव गुरव, आरवली-वेंगुर्ले-पारंपरिक होळीचा उत्सव, सुनील महाले, सावंतवाडी-कळसुत्री बाहुल्यांचा खेळ, आदमी ग्रुप, सावंतवाडी-गणेश-राक्षस युद्ध असे देखावे सादर करण्यात आले. या सर्व देखाव्यांचे आदित्य ठाकरे यांनी निरीक्षण करीत तरंगत्या तराफ्यावरील शोभा यात्रेला शुभेच्छा दिल्या.सावंतवाडी पर्यटन महोत्सवनिमित्ताने राज्यमंत्री दीपक केसरकर यांचा युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, नगराध्यक्ष बबन साळगावकर, विलास जाधव उपस्थित होते.
विकासाचा लाल दिवा दिला
By admin | Updated: December 25, 2014 00:12 IST