ओरोस : निवती किल्ला व भोगवे सागर किनाऱ्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून मंजूर १ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर आहे. यापैकी १ कोटीचा निधी सिंधुदुर्ग पर्यटन विभागाकडे प्राप्त झाला आहे. या दोन्ही पर्यटन स्थळांचे विकास आराखडे वरीष्ठ कार्यालयाकडून प्राप्त होताच या पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग पर्यटन विकास महामंडळाचे प्रकल्प अधिकारी दीपक माने यांनी दिली.वेंगुर्ले तालुक्यातील निवती किल्ला व भोगवे सागर किनाऱ्याचा पर्यटनाच्या दृष्टीने हवा तसा विकास झालेला नाही. या पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने प्रादेशिक पर्यटनमधून १ कोटी ५० लाख एवढा निधी मंजूर केला होता. त्यापैकी १ कोटीचा निधी सिंधुदुर्ग पर्यटन विभागाकडे प्राप्त झाला आहे. सदस्यानी निधी खर्च का झाला नाही असे विचारले असता दीपक माने म्हणाले, सदरचा किल्ला व भोगवे सागरकिनारा शासनाच्या ताब्यात असल्याने त्यावर निधी खर्च करता येत नव्हता. या पर्यटन स्थळांचा विकास व्हावा व पर्यटक तेथे आकर्षित व्हावे या उद्देशाने तत्कालीन जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी ही पर्यटन स्थळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यात दिली आहेत. त्यामुळे या पर्यटन स्थळांना प्राप्त निधीतून पर्यटनदृष्ट्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. ही पर्यटन स्थळे केली गेल्याने त्यांचा विकास आता झपाट्याने होणार हे निश्चित आहे. (वार्ताहर)
१ कोटींचा निधी प्राप्त
By admin | Updated: August 7, 2015 23:47 IST