रत्नागिरी : रेल्वे प्रवाशांची संख्या विचारात घेऊन रत्नागिरी-वसई ही पॅसेंजर गाडी लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दिली. शिवसेना सुवर्णमहोत्सव वर्षानिमित्त रत्नागिरीमध्ये आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी गीते म्हणाले की, कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम गेले अनेक दिवस निधीअभावी रखडले होते. मात्र, आता निधीची टंचाई दूर झाली आहे. याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशीही चर्चा पूर्ण झाली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा १५ आॅक्टोबरला कोकण रेल्वेच्या रौप्यमहोत्सव वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाच्या कामाचाही शुभारंभ केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर राहणाऱ्या कोकणी लोकांची संख्या अधिक आहे. हे लक्षात घेऊन वसई ते रत्नागिरी ही पॅसेंजर गाडी लवकरच सुरू केली जाणार आहे. त्यालाही रेल्वेमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविला असल्याची माहिती गीते यांनी दिली. कोकणातील प्रस्तावित केमिकल झोनबाबत विचारले असता गीते म्हणाले, याबाबत कोणताच निर्णय झालेला नाही. त्यामुळे यावर भाष्य करणे योग्य नाही. (शहर वार्ताहर)
रत्नागिरी-वसई पॅसेंजर रेल्वे लवकरच : गीते
By admin | Updated: October 3, 2015 22:51 IST